सातारा :
बांबु प्रोसेसिंग युनिट स्थापन करण्यासाठी फॉरेन फडींगमधून कर्ज मिळवून देतो असे आमिष दाखवून कोल्हापूरच्या व्यावसायिकांची 13 लाखांची फसवणूक केली आहे. असेच आमिष दाखवून सांगलीतील एकाची चार लाखांची फसवणूक केली आहे. कुशल साताप्पा कुकडे (वय 38) व बाजीराव जोती पाटील अशी त्यांची नावे आहे. यांनी दिलेली तक्रारीवरून दिलीप अरविंद प्रभुणे (रा. शाहूनगर सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गतवर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात व्यावसायिक कुशल कुकडे यांची दिलीप प्रभुणे याच्याशी भेट झाली. या ओळखीचा फायदा घेत दिलीप प्रभुणे याने राधानगरी येथे बांबु प्रोसेसिंग युनिट स्थापन करण्यासाठी फॉरेन फंडीगमधून अलअन्सारी क्रेडीटरस दुबई यांच्याकडून कर्ज प्रकरण करून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून कुशल कुकडे यांनी सर्व कागदपत्रे दिली. याचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून त्यावर कुशल कुकडे यांच्या सह्या घेतल्या. यामुळे कुशल कुकडे यांचा विश्वास बसला. त्यानंतर वेळोवेळी कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली 13 लाख रूपये घेतले.
अशीच फसवणूक बाजीराव जोती पाटील यांचीही करून त्यांच्याकडून 4 लाख रूपये घेतले. मात्र कर्ज करून दिले नाही. याबाबत दोघांनी विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिली. नंतर पैसे देण्यासही नकार दिल्याने कुशल कुकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यात दिलीप प्रभुणे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करत आहेत.








