शुक्रवारच्या भन्नाट ऑफरने अनेकांना केले आकर्षित : निपाणी शहर-ग्रामीण भागातून मोठी गुंतवणूक
वार्ताहर/निपाणी
निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भाग असो किंवा इतर कोणत्याही भागात अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार अनेक घडले आहेत. काही ठिकाणी गुंतवणूक करायला लावले आहे. तर काही ठिकाणी दररोजचे उत्पन्न मिळवून देण्याचे आमिष दाखवले गेले. पण शेवटी फसवणूक झाली, हे अनेकांनी अनुभवले आहे. यातून जागृती देखील केली गेली. पोलीस प्रशासनाकडून तर दररोज याविषयी जागृती केली जात आहे.
केंद्र व राज्य सरकार त्याचबरोबर अनेक सामाजिक संघटना देखील जागृतीसाठी पुढे आल्या आहेत. तरी देखील फसवणूक थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही आणि फसणाऱ्यांची संख्या देखील कमी होताना दिसत नाही. असाच काहीसा अनुभव निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांना नुकताच आल्याची चर्चा सुरू झाली आहे. या गुंतवणूकमध्ये अल्पवधीत म्हणजेच मोजक्याच दिवसात तिप्पट रक्कम देण्याची लालसा दाखवली गेली होती. पण शेवटी गुंतवणूक कंपनीचे अॅप बंद झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे गुंतवणूकदारांना लाखोंचा गंडा बसला असून याबाबत अजून कोणीही तक्रारीसाठी मात्र पुढे आल्याचे दिसत नाही.
मार्केट मास्टर कंपनीच्या माध्यमातून योजना
या गुंतवणूक आणि मिळणारा नफा याविषयी समजलेली अधिक माहिती अशी की निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागात काही गुंतवणूक प्रतिनिधींनी गेल्या तीन महिन्यापासून मार्केट मास्टर कंपनीच्या माध्यमातून अल्पावधीत गुंतवणुकीतून अधिक नफा मिळवणाऱ्या योजना देण्याचे काम सुरू केले. सुरुवातीच्या टप्प्यात अवघे 300 रुपये गुंतवून दिवसाला 30 रुपये देण्याचे आमिष दाखवले गेले. यानंतर दोन दिवसात 360 रुपये संबंधित बँक खात्यात जमा देखील केले गेले. यातून काहीसा विश्वास मिळवला गेला. याच विश्वासाच्या जोरावर थोड्या थोड्या रकमेचा परतावा देत गुंतवणूकदार वाढवण्यात आले. नवनव्या योजना देताना गुंतवणूक प्रतिनिधी मंडळींना प्रमोशन देण्याचे काम देखील केले गेले. गुंतवणुकीचे महत्त्व आणि मिळणारा लाभ याची माहिती देण्याच्या उद्देशाने नामांकित हॉटेलमध्ये सेमिनार देखील घेतले गेले आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात आले.
उत्पन्न मिळवण्याची लालसा
थोडक्याशा गुंतवणुकीतून मिळणारा परतावा लक्षात घेऊन शहर व ग्रामीण भागातील अनेकांनी यामध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली. वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत दररोजचे उत्पन्न मिळवण्याची लालसा वाढवली गेली. शुक्रवार 18 रोजी दररोज परतावा देणाऱ्या मोठ्या गुंतवणुकीच्या योजना जाहीर करण्यात आल्या. गेल्या अगोदरच्या दिवसात मिळवलेला गुंतवणुकीचा विश्वास आणि नव्याने सुरू केलेल्या योजना याचे आकर्षण अनेकांना वाढले. गुंतवणूकदारांनी आपल्या जवळचा पैसा लावलाच, पण त्याचबरोबर काहींनी खासगी सावकार, मित्रपरिवार, फायनान्स कंपनी यातून पैसे उचलत गुंतवणूक केली. शनिवार, रविवार सुट्टीचे कारण सांगत कंपनीने वेळ मारून नेली आणि गुंतवणूक अधिकची वाढवून घेतली. पण इतका परतावा कंपनी कसा काय देऊ शकते? याची चाचपणी देखील कोणी केली नाही. मोठ्या गुंतवणुकीनंतर आता कंपनीने गुंतवणूक अॅपच बंद केले आहे.
अॅप बंद झाल्यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांना दिलासा देण्याचा दिखावा करत अॅप अपडेट होत आहे, असे सांगितले. मंगळवारपासून तर गुंतवणूकदारांना आधीची गुंतवणूक मिळवायचे असेल तर अधिकची सहा हजाराची गुंतवणूक तातडीने करावी असे निवेदन केले आहे. यासाठी काही तासांचा वेळ देखील निश्चित करून दिला आहे. या वेळेत गुंतवणूक न झाल्यास संपूर्ण गुंतवणूक शून्य होईल असे देखील सांगितले आहे. यामुळे गुंतवणूकदारांना आता फसवणूक झाली आहे, हे समजू लागले आहे. गुंतवणूक प्रतिनिधींमध्ये काही शिक्षकांचा देखील समावेश आहे. हॉटेलमध्ये सेमिनार घेत माहिती देण्यामध्ये त्यांचे अग्रस्थान होते. हे देखील बोलले जात आहे. लाखोंचा गंडा घालणाऱ्या या कंपनीविरोधात अजून कोणीही तक्रार केली नसली तरी पुढे काय होणार? याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.










