आयात वाढल्याची नोंद : भू राजकीय तणाव व वस्तूंच्या किमती कमी झाल्याचा परिणाम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लाल समुद्राच्या संकटासारख्या भू-राजकीय तणावामुळे आणि वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे भारतातून व्यापारी मालाच्या निर्यातीचे मूल्य यावर्षी एप्रिलमध्ये 5 महिन्यांतील सर्वात कमी झाले. असे वाणिज्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सांगितले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात भारतातून व्यापारी मालाची निर्यात गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत 1 टक्क्यांनी घसरून 34.99 अब्ज डॉलर्सची झाली आहे. परंतु व्यापारी मालाची आयात 10.25 टक्क्यांनी वाढून 54.09 अब्ज डॉलर झाली आहे. घटती निर्यात आणि वाढत्या आयातीमुळे व्यापार तूट 19.1 अब्ज डॉलरवर गेली, जी गेल्या पाच महिन्यांतील सर्वात मोठी आहे.
देशाच्या एकूण आयातीमध्ये जर का वाटा पाहिल्यास पेट्रोलियम उत्पादने त्यात अधिक आहेत.उत्पादनांचा वाटा सुमारे 32 टक्के आहे. या वर्षी एप्रिलमध्ये पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात सुमारे 20 टक्क्यांनी वाढून 16.64 अब्ज डॉलर झाली आहे. सोन्याची आयातही तिपटीने वाढून 3.1 अब्ज डॉलरची झाली. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्ये इलेक्ट्रॉनिक्सची आयात 10 टक्क्यांनी वाढून 7.05 अब्ज डॉलर झाली आहे. पेट्रोलियम आणि रत्नांव्यतिरिक्त वस्तूंची आयात 2 टक्क्यांनी वाढून 32.72 अब्ज झाली आहे.
पेट्रोलियम आणि दागिने वगळता इतर निर्यात देशाच्या निर्यात स्थितीची खरी कल्पना देतात. यावर्षी एप्रिलमध्ये या श्रेणीतील उत्पादनांची निर्यात 1.32 टक्क्यांनी वाढून 26.77 अब्ज डॉलरची झाली आहे. एकूणच, एप्रिल 2024 मध्ये देशातील 30 पैकी 17 क्षेत्रांतील उत्पादनांची निर्यात घटली आहे.
वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी सांगितले की, निर्यातदारांना पुढील काळासाठी चांगल्या ऑर्डर मिळाल्या आहेत आणि गेल्या काही महिन्यांत देशात वाढत असलेला मालाचा साठा कमी झाला आहे.
मुख्य अर्थतज्ञ अदिती नायर यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत यावेळी तेलाची तूट वाढली आहे, ज्याचे मुख्य कारण म्हणजे सोन्याची आयात तिप्पट आहे. ते म्हणाले, आतापर्यंत, आर्थिक वर्ष 2025 साठी चालू खात्यातील तूट जीडीपीच्या 1.2 टक्के राहण्याची अपेक्षा आहे.









