जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली पाहणी
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. आंदोलने, मोर्चे, धरणे, सत्याग्रह असे कार्यक्रम दररोज होत असतात. त्यामुळे बऱयाचवेळा या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. पार्किंगची समस्या निर्माण होत आहे. आंदोलनकर्त्यांना पाऊस व उन्हातच थांबावे लागते. त्यामुळे आता जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी या सर्व समस्या सोडविण्यासाठी जातीने लक्ष दिले असून त्यांनी गुरुवारी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांना बोलावून काही सूचना केल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये सध्या बॅरिकेड्स लावणे तसेच लोखंडी अँगल्सदेखील लावण्यात आले आहेत. मोर्चेकऱयांना उन्हातच उभे रहावे लागत आहे. याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश करताना चारचाकी वाहनांची समस्या होत आहे.
याचबरोबर या आवाराच्या परिसरात वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे.
न्यायालय आणि प्रादेशिक आयुक्त कार्यालयाला लागून असलेल्या खुल्या जागेमध्येही बेशिस्तपणे पार्किंग केले जात आहे. त्यामुळे समस्या निर्माण होत आहे.
या समस्यांमुळे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी गुरुवारी अधिकाऱयांना बोलावून सूचना केल्या आहेत. याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता आणखी दोन ते तीन दिवस थांबा तुम्हाला आराखडा तयार असलेल्या ब्ल्यू प्रिंट देऊ, असे त्यांनी यावेळी सांगितले. आताच काही सांगणार नाही. जेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, तेव्हाच तुम्हाला याची माहिती देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.









