16580 फूट उंच , 4.25 किमी लांब
हिमाचल प्रदेशला लडाखशी जोडण्यासाठी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) शिंकुला खिंडीवर जगातील सर्वात उंच बोगदा बांधणार आहे. हा बोगदा 16,580 फूट उंचीवर असून रोहतांग येथील अटल टनेल नंतरचा तो जगातील सर्वात उंच आणि सर्वात लांब बोगदा असणार आहे. जगात नवा विक्रम प्रस्थापित करणाऱया या बोगद्याचे बांधकाम यावषी जुलैपासून सुरू होऊन 2025 पर्यंत पूर्ण होईल. या बोगद्यामुळे झांस्कर खोऱयाची अर्थव्यवस्था बदलणार आहे.

शिंकुला खिंडीवरील बोगदा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. हा बोगदा सीमेवर रसद वाहतूक करण्यासाठी तिसरा आणि सुरक्षित पर्याय असेल. सध्या, लेह-लडाखसाठी पहिला पर्याय पाकिस्तान सीमेला लागून असलेला झोजिला पास आहे आणि दुसरा पर्याय चीन सीमेला लागून असलेला बरलाचा पास आहे. आता हा तिसरा मार्ग शिंकुला खिंडीतील बोगद्यातून केला जाणार आहे. हा मार्ग दोन्ही देशांच्या सीमेपासून मध्यभागी असेल. त्यामुळे हा मार्ग अत्यंत सुरक्षित ठरणार आहे. सध्या लेह रस्त्यावर मनाली ते दार असा 101 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो आणि त्यानंतर दार ते शिंकुला खिंडीत वळून झांस्कर व्हॅलीत जावे लागते. या बोगद्याच्या बांधकामामुळे लेह-लडाखची झांस्कर व्हॅली वर्षातील बहुतेक महिने लाहुल आणि मनालीशी जोडली जाईल. लेह-लडाखच्या या खोऱयातील काही गावे अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. बोगद्याच्या बांधकामामुळे झांस्कार, पूर्णे, पदुम, जंगला, करश, मुणे असे बहुतांश भाग परदेशातील पर्यटकांना पाहता येणार आहेत. पर्यटन व्यवसायामुळे या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत होईल.









