कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
‘या गवरीच्या महिन्यात गवरी लागल्या फुलायला
बंधू लागले बोलायला जातो बहिणाला आणायला…’
गणेश आगमनानंतर महिलांना गौरी आवाहनाचे वेध लागते. रात्रीच्या जेवणानंतर महिला गौराईच्या गाण्यावर फेर धरु लागल्या आहेत. त्यामुळे गौरीच्या गाण्यांचे सूर ऐकू येऊ लागले आहेत. रात्री उशिरापर्यंत झिम्मा-फुगडी, काटवटकणा, घोडाघोडा आदी खेळ खेळून गौरी आवाहनाचा आनंद द्विगुणीत करू लागल्या आहेत.
गौरी आवाहन रविवार 31 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यादृष्टीने घरा-घरांमध्ये गौरी-शंकरोबाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. गणपतीसमोर गौरी-शंकरोबाची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामुळे गणपतीलाच सजावट व आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. आपल्या घरातील गौरी-शंकरोबा आकर्षक सजवण्याची तयारी महिला करीत आहेत. गौरीची नऊवारी साडी, कोल्हापुरी साज, गजरा, किरीट खरेदीवर भर दिला आहे. तर शंकरोबाला पारंपरिक कुर्ता, धोतर किरीट, त्रिशुल, डमरू यांची जमवाजमव केली जात आहे. त्याचप्रमाणे पुरण-पोळीसह गोडाचा नैवद्य अर्पण करण्यासाठी विविध पदार्थही तयार करण्याची लगबग सुरू आहे. दिवसभराची कामे उरकून रात्री जेवणानंतर महिला गौराईच्या गाण्यावर फेर धरून गौराई आवाहन करीत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी सासर-माहेरच्या गाण्यांचे सूर कानी पडू लागले आहेत.

‘मी बघते चंद्राला पदर माझ्या खांद्याला
येवढ्या गवरी सणाला बाप आलाय न्यायला…’
अशा गाण्यातून माहेरच्या माणसांचे गोडवे गायले जातात. आई, वडील, भाऊ, बहीण आपली कशी काळजी घेतात. तसेच गौराईच्या सणाला शिदोरी घेऊन माहेरी घेऊन येतात, हे गाण्यातून व्यक्त केले जाते. रात्री उशिरापर्यंत विविध खेळ खेळले जातात.
‘जणे ग, ओ ग
सासू तुझी बोलावती जणे घरला चल ग
तपकीर बिपकीर सापडत नसेल
शोधायला मला बोलवत असेल
येत न्हाय म्हणून सांग ग…..’

या पारंपरिक गाण्यातून सारसरची माणसं आपला कामापुरता कसा वापर करतात, हे सांगितले जाते. महिला गौरीच्या गाण्यातून व्यक्त होताना दिसतात. ही पारंपरिक गाणी मौखिक पद्धतीने पुढच्या पिढीपर्यंत पोहचवली जातात. अलीकडे ही गाणी लोप पावत चालली आहेत, असे म्हटले जाते. परंतू या गौरीच्या सणाच्या माध्यमातून ही गाणी जतन केली जातात, याची प्रचिती येते. गौरी आवाहनाला नऊवारी साडीसह पारंपरिक वेशभूषा, केशभूषा करून नटून-थटून गौरीचे स्वागत करतात. त्यामुळे रविवारी कशा पद्धतीने शृंगार करायचा याची तयारीदेखील महिला करीत आहेत. गौराई जागवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत खेळही खेळले जात आहेत. गौरीई आगमनालाही झिम्मा-फुगडीचे खेळ खेळले जातात.
आत्मिक समाधान आणि आनंद
गौरीच्या सणामध्ये सर्व महिला एकत्र येत खेळ खेळत असल्याने त्यांना आत्मिक समाधान मिळते. तर मैत्रिणींना एकत्रितपणे गप्पा मारण्याची संधी मिळत असल्याने आनंदही मिळतो. खेळाच्या माध्यमातून कामातून थोडीशी उसंत मिळते. आपल्या मर्जीने सर्व प्रकारचे खेळ खेळल्याने गौरी आगमनाचा आनंद व्दिगुणीत होतो.








