पुणे / प्रतिनिधी :
भव्यदिव्य चित्ररथाची आकर्षक मांडणी…ढोल-ताशा आणि लेझीम पथकासह शंखनाद, रंगीबेरंगी फुलांची सजावट आणि रांगोळय़ांच्या पायघडय़ा…अशा चैतन्यदायी वातावरणात रविवारी काढण्यात आलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले दांपत्य सन्मान महारॅलीद्वारे फुले दांपत्याचा जीवनपट उलगडला.
निमित्त होते माळी महासंघातर्फे दगडुशेठ गणपती मंदिरासमोरील भिडेवाडा ते गंज पेठेतील महात्मा फुलेवाडादरम्यान (समताभूमी) काढण्यात आलेल्या फुले दांपत्य सन्मान महारॅलीचे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. स्त्रियांसाठी शिक्षणाची द्वारे खुली करून देण्याच्या या ऐतिहासिक घटनेला 175 वर्षे (शतकोत्तर अमृत महोत्सव) पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने फुले दांपत्याच्या या महान कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारकाचे निर्माण तसेच विकास करण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
अधिक वाचा : बार्शीत फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 5 जणांचा मृत्यू
दगडूशेठ गणपती मंदिरासमोरील भिडेवाडा येथून या महारॅलीला प्रारंभ होऊन पुढे शिवाजी रोडमार्गे फडगेट पोलीस चौकी येथून डाव्या बाजूने गंजपेठ पोलीस चौकी आणि महाराणा प्रतापरोडने गंज पेठेतील महात्मा फुलेवाडा अर्थात समता भूमी येथे येऊन सर्व फुलेप्रेमींनी फुले दांपत्याला अभिवादन केले. या महारॅलीचा समारोप सावित्रीबाई फुले स्मारक येथे करण्यात आला. या महारॅलीमध्ये माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, संयोजक पुणे शहर अध्यक्ष दीपक जगताप, प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे, माजी आमदार कमल ढोले पाटील, नानासाहेब कांडलकर, रवींद्र आंबाडकर, रुपालीताई चाकणकर, काळुराम गायकवाड यांच्यासह मोठय़ा संख्येने फुलेप्रेमी सहभागी झाले. महिला अध्यक्ष स्मिता लडकत यांनी आभार मानले.








