प्रतिनिधी/ बेळगाव
रात्रीच्या अंधारात चालत घरी जात असताना रस्त्याशेजारील विहिरीत पडलेल्या एका युवकाला तब्बल नऊ तासांनंतर विहिरीतून बाहेर काढण्यात आले. एसडीआरएफच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली. नऊ तास या युवकाने विहिरीच्या एका कोपऱ्यात जीव मुठीत धरून रात्र काढली. मोदगा, ता. बेळगाव येथे ही घटना घडली.
श्रीनाथ अशोक पाटील (वय 36) रा. मोदगा असे त्या युवकाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चालत घरी जाताना रस्त्याशेजारील विहिरीत पडला. सदर विहीर 60 फूट खोल असून त्यामध्ये पोहून तो एका कडेला आला. आरडाओरड करूनही रात्री कोणीच पोहोचले नाही. त्यामुळे श्रीनाथने संपूर्ण रात्र विहिरीतच काढली.
विहिरीतून आवाज येताच पाहिले डोकावून
शनिवारी सकाळी श्रीनाथने विहिरीतून आवाज दिला. त्याचा आवाज ऐकून या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता एका कडेला तो बसल्याचे दिसून आले. तातडीने मारिहाळ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. एसडीआरएफचे पथक दाखल झाले. आरपीआय श्रीशैल चौगुला, आरएसआय रवि गाणगेर व किरण लक्ष्मण पाटील आदींसह पथक दाखल झाले.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल
नऊ तास विहिरीत अडकून पडलेल्या श्रीनाथला किरण पाटील यांनी बाहेर काढले. सकाळी 8 वाजता प्रयत्न सुरू करण्यात आले होते. दोन तासांनतर श्रीनाथला विहिरीतून बाहेर काढले. त्याच्या डाव्या हाताचे हाड मोडले आहे. त्यामुळे त्याला रुग्णवाहिकेतून तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.









