मंडणगड / विजय जोशी :
पूर्वी मुलांना मिळणाऱ्या मोकळ्या वेळेत अनेक खेळ रंगायचे. मागील पिढीच्या अनेक आठवणी आजही लगोरी, अबादुबी, गोट्या, विटू-दांडू आईचं पत्र हरवलं, पकडा-पकडी, आंधळी कोशिंबीर यासारख्या खेळांमध्ये रमतात. मात्र आजच्या मोबाईल गेम्सच्या जमान्यात हे खेळ हरवले आहेत. समाजप्रबोधनात्मक गणेशोत्सव सादरीकरणात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाने यावर्षी अनेक जुने खेळ ‘जिवंत’ केले आहेत. या माध्यमातून एक वेगळा विषय हाताळत सुदृढ आरोग्यासाठी मोबाईलपासून लांब रहात पुन्हा मैदानावर जाण्याचा दिला जाणारा संदेश गणेशभक्तांची मने जिंकत आहे. जिल्हा व राज्य स्तरावरील शासकीय विविध संस्थाचे पुरस्कार प्राप्त करणाऱ्या तालुक्यातील पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने यंदा जिवंत देखाव्यांच्या माध्यमातून मोबाईलचा पालघरवाडी अतिवापर कमी करण्याचा संदेश दिला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव व टाकाऊ वस्तूंपासून शक्य तितक्या नैसर्गिक वस्तूंचा वापर करून सजावट करणाऱ्या या मंडळाने यंदा गणेशभक्तांसाठी सर्वार्थाने वेगळा पण ज्वलंत विषय हाताळला आहे.
- मोबाईलमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रकाशझोत
बदलत्या समाजमनात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंतच्या सर्वांच्या जीवनाचा मोबाईल हा जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. सोशल मीडिया, रिल्स व मोबाईल गेम्समध्ये अनेकांचा वेळ वाया जात आहे. त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. यापासून लहान मुलेही वाचलेली नाहीत. लहानपणी खेळणारी-बागडणारी व उत्साहाने भरलेली मुले आता मोबाईलवर खेळ खेळत आहेत. घराशी व समाजाशी त्यांचे असलेले नाते तुटत चालले आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न पालघरवाडी गणेशोत्सव मंडळाने केला आहे.
- मोबाईलच्या कमी वापराचा संदेश
या संकल्पनेतून मोबाईलचा शक्य तितका कमी वापर करण्याचा संदेश मुले देतात. काही वेळासाठी एका वेगळ्या जगात सगळ्यांना घेऊन जातात. त्यामुळे पालकांनी लहान मुलांसह या उत्सवास भेट देऊन ही संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. उत्सवाच्या आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष अशोक बैकर, सचिव अनंत घाणेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मेहनत घेत आहेत.
- हरवलेले खेळ केले ‘जिवंत’
मोबाईलचा माहिती मिळवण्यासाठी गरजेपुरता वापर करा, मोबाईलच्या राक्षसापासून कुटुंब समाज व देश वाचवा असे संदेश देत मंडळाने प्रवेशद्वारावर गणेशभक्तांचे स्वागत केले आहे. यानंतर गणरायांचे दर्शन झाल्यावर सध्याच्या जमान्यात अनेक लुप्त झालेले खेळ मंडळाने ‘जिवंत’ केले आहेत. यात पालघरवाडीचे बालकलाकार लगोरी, अबादुबी, गोट्या, विटू दांडू आईचे पत्र हरवले, पकडा पकडी, आंधळी कोशिंबीर असे खेळ खेळताना दिसून येतात. याचबरोबर ते या पूर्वीच्या खेळांची माहिती देतात. त्यामुळे हे खेळ न खेळलेली आजची पिढी हरखून जाते व खेळ खेळलेली मागची पिढी आठवणीत रमून जाते.








