कुरळप / महादेव पाटील :
वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द परिसरात सध्या जंगली प्राण्यांचा वावर उसाच्या शेतातून व नागरी वस्तीच्या शेजारी दिसून येत आहे. पूर्वी जंगलात आढळणारा बिबट्या आता थेट शेतांमध्ये वावरताना आढळतो आहे. यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून, वनविभाग यावर काही उपाययोजना करणार का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
वाळवा तालुक्यातील कार्वे, इटकरे, देवर्डे येथे अलीकडेच बिबट्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. हे मृत्यू नागरी वस्त्यांना लागूनच झाले आहेत. त्यामुळे बिबट्या जंगलात नसून थेट उसाच्या शेतात वावरताना दिसतो आहे. प्राणीमित्रांच्या मते, बिबट्या जंगली अधिवास सोडून मानवी वस्तीकडे का वळत आहे, याचे चिंताजनक कारण शोधणे आवश्यक आहे.
- शहराच्या दारात बिबट्यांचा मुक्त संचार
कधीकाळी फक्त दूरदर्शनवर पाहायला मिळणारे हे प्राणी आता थेट गावांमध्ये वावरताना दिसत आहेत. ऐतवडे खुर्दमधील बळवंत कॉलनीसारख्या वस्त्यांमध्ये बिबट्या रोज दिसतो. शेतकरी अजित पाटील, बाळासाहेब माने, बाजीराव पाटील, प्रशांत पाटील यांच्या शेतातून तो भक्ष्याच्या शोधात फिरताना दिसतो.
- डोंगराळ परिसरात वाढलेला वावर
शिराळा तालुक्यातील लादेवाडीचा डोंगर, कार्वे, कापरी, डोंगरवाडी, शेखरवाडी या गावांच्या डोंगररांगांमध्येही बिबट्यांचा वावर वाढला आहे. अनेक वेळा बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये शेळ्या, मेंढ्या, वासरे यांचे नुकसान झाले आहे. मागील वर्षी शिराळा तडवळे येथे बिबट्याने एका लहान मुलाचा जीव घेतला होता.
- बिबटे जंगल सोडून वस्तीकडे का वळतात?
प्राणीमित्रांच्या मते, जंगली अधिवासातील अन्नसाखळी व पर्यावरणीय संतुलन कोलमडले आहे. त्यामुळे बिबटे मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. मानवाच्याच चुकीच्या हस्तक्षेपामुळे हे प्राणी आता मानवी वस्त्यांना धोका बनू लागले आहेत.
- हजारो हेक्टर उसाचे क्षेत्र – बिबट्यांसाठी लपण्याची जागा
वाळवा तालुक्याचा पश्चिम, उत्तर व दक्षिण भाग प्रामुख्याने उसखाली गेलेला आहे. याशिवाय परिसरात डोंगररांगा असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळते. तसेच भटक्या कुत्र्यांचा आणि पाळीव जनावरांचा शिकार उपलब्ध असल्यामुळे बिबट्यांचा वावर वाढला आहे. वनविभाग यावर उपाययोजना करणार का? हा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.
- डोंगर, महामार्ग आणि मृत्यूचे सत्र
इटकरे परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर बिबट्यांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. शिवपुरी, जक्राईवाडी व मल्लिकार्जुन डोंगर या डोंगररांगांमध्ये काही प्रमाणात झाडी आहे, तर उतारावर उसाची शेती. ही ठिकाणे बिबट्यांना सुरक्षित वाटत असावीत.
- जीवित व वित्तहानी
बिबट्यांचा वावर शेतांमध्ये व वस्त्यांमध्ये सतत वाढत चालला आहे. दुधाळ जनावरांवर हल्ले होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान व जनावरांची जीवितहानी होऊ शकते. वनविभागाने तत्काळ आणि ठोस उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. “जंगलातील प्राणी मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागलेत, यामागे मानवाच्या चुकीचा वाटा आहे. वनविभागाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात.”
-डॉ. जोस्त्ना पाटील, माजी सरपंच








