कोल्हापूर :
दूधगंगा प्रकल्पातील काळम्मावाडी धरणाची गळती रोखण्याच्या कामाला जानेवारीमध्येच सुरूवात झाली आहे. या कामासाठी दोन वर्षांची मुदत आहे. मात्र, जलदगतीने काम संपवून येत्या वर्षात धरणाची गळती रोखण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे–पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. अलमट्टीबाबत महाराष्ट्र शासनाने आपली भूमिका याअगोदरच मांडली असून सर्वोच्च न्यायालयाने उंची वाढविण्यासाठी स्थगिती दिली आहे. त्यानुसार कोणत्याही प्रकारे अलमट्टी धरणाची उंची वाढविली जाणार नाही. त्याबाबत कोणतेही काम सुरू नसल्याचेही मंत्री विखे–पाटील यांनी यावेळी सांगितले.
काळम्मावाडी धरण गळतीमुळे शेतकऱ्यांची अडचण निर्माण होत आहे. शेतकऱ्यांच्या निर्णय व योजनासाठी राज्य सरकार संवेदनशिल आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी टंचाई होऊ, नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. काळमावाडी धरणाची गळती रोखण्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
- हिरण्यकेशी नदीवर 3 टीएमसीचा बंधारा उभारू
आजरा, कागल तालुक्याच्या सीमेवरील किटवडेसह अन्य ग्रामीण भागातील गावांवर दरवर्षी पाण्याचे संकट ओढवते. या भागात पावसाचे प्रमाणाही अन्य तालुक्याच्या तुलनेत अधिक आहे, असे असुनही या भागात पाणी टंचाई भासत आहे. यावर उपाय म्हणून हिरण्यकेशी नदीवर हिरण्यकेशी– किटवडे याठिकाणी तीन टीएमसी पाणी साठ्याचा बंधारा उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री विखे–पाटील यांनी स्पष्ट केले.








