वृत्तसंस्था/ बेंगळूर
यंदाच्या आयपीएलच्या साखळी फेरीतील शेवटचा सामना आज रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या गुजरात टायटन्सदरम्यान होणार असून यावेळी प्ले-ऑफसाठी पात्र होण्यासाठी नेमके काय करणे आवश्यक आहे त्याचे चित्र ‘आरसीबी’समोर स्पष्ट असणार आहे. या मोसमात त्यांचा विराट कोहली त्याच्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसलेला असून कर्णधार फाफ डू प्लेसिस 600 हून अधिक धावा करत आघाडीवर आहे. त्यामुळे विजय आवश्यक असलेल्या या सामन्यात ही चमकदार सलामीची जोडी नेहमीप्रमाणे धडाकेबाज सुरुवात करून देईल अशी आशा ‘आरसीबी’ बाळगून असेल.
सध्या चौथ्या स्थानावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूची धाव सरासरी ही 0.180 इतकी असून ती मुंबई इंडियन्सपेक्षा (उणे 0.128) चांगली आहे. मुंबईचा संघ आज रविवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादशी लढणार आहे. आज ‘आरसीबी’ला घरच्या मैदानावर खेळत असल्याने प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळेल. त्याशिवाय डू प्लेसिसच्या संघासाठीची दुसरी अनुकूल बाब म्हणजे संध्याकाळी साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात ते उतरतील तेव्हापर्यंत मुंबई आणि सनरायजर्स यांच्यातील सामन्याचा निकाल त्यांना कळलेला असेल. तथापि ते गतविजेत्या गुजरात टायटन्सकडून हरले, तर त्या निकालाला काहीही अर्थ राहणार नाही.
गुजरात टायटन्स हा एक मजबूत संघ आहे यात कोणतीही शंका नाही आणि संपूर्ण हंगामात अष्टपैलू हार्दिक पांड्याने त्यांचे प्रशंसनीय पद्धतीने नेतृत्व केले आहे. आपल्या पहिल्याच हंगामात जिंकलेले विजेतेपद कायम ठेवण्याची त्यांना यावेळी चांगली संधी आहे. गुजरात टायटन्स नऊ सामने जिंकून आणि चार गमावून 18 गुणांसह आघाडीवर आहे, तर आरसीबी सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्ससवेमत बरोबरीत आहे. गुजरात व ‘आरसीबी’ या दोन्ही संघांनी त्यांच्या मागील सामन्यात मोठे विजय मिळवलेले आहेत. गुजरातने सनरायजर्स हैदराबादवर 34 धावांनी, तर ‘आरसीबी’ने 2016 च्या या विजेत्यांवर आठ गडी राखून विजय मिळविला.
आरसीबीच्या मागील विजयात कोहलीने शानदान शतक झळकावले. ते त्याचे ‘आयपीएल’मधील सहावे शतक आहे. कोहली आणि डू प्लेसिस या दोघांनीही आक्रमक फलंदाजी करून ‘सनरायजर्स’विऊद्धच्या त्यांच्या मागील सामन्यात ज्या पद्धतीने 186 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला त्यामुळे ‘आरसीबी’चा विश्वास नक्कीच वाढलेला असेल. तथापि गुजरात टायटन्सकडे असलेले गोलंदाज आणि आपल्या प्रत्येक सामन्यामध्ये त्यांनी दाखवलेला आत्मविश्वास लक्षात घेता ‘आरसीबी’साठी हा एक वेगळा सामना ठरेल. कोहली, डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल हे त्रिकूट गुजरातच्या माऱ्याविऊद्ध कसे खेळते ते पाहणे मनोरंजक ठरेल.
सर्वाधिक धावा काढणारा ‘ऑरेंज कॅप’धारक हा दक्षिण आफ्रिकेचा डू प्लेसिस असून त्याने आतापर्यंत 13 सामन्यांत 631 धावा केल्या आहेत. षटकार (34) खेचण्यातही तो आघाडीवर आहे. दुसरीकडे, सर्वाधिक धावा काढणाऱ्यांच्या यादीत कोहली 438 धावांसह सहाव्या स्थानावर आहे. तथापि, कोहली, डू प्लेसिस आणि मॅक्सवेल यांच्यावरील आरसीबीचं अत्याधिक अवलंबन हे चिंतेचे प्रमुख कारण आहे. जर गुजरात टायटन्सचे गोलंदाज लवकर बळी मिळवू शकले, तर पाहुण्यांचे पारडे भारी ठरेल. आरसीबीचा विचार करता मोहम्मद सिराज हा या हंगामातील त्यांचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे आणि वेन पारनेलसह माऱ्याची जबाबदारी प्रामुख्याने त्याच्यावर राहणार आहे. पण त्यांचा सामना फॉर्मात असलेला शुभमन गिल, वृद्धिमान साहा, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया आणि कर्णधार पांड्या यांच्याशी होईल.
कोहलीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गिलनेही मागील सामन्यात शतक झळकावले आहे आणि तो ‘आरसीबी’साठी धोकादायक ठरू शकतो. मोहम्मद शमी, रशिद खान आणि मोहित शर्मा यांसारखे अनुभवी गोलंदाज पदरी असल्याने गुजरातचा मारा प्रभावी आहे. परंतु महान खेळाडूंनी भरलेला संघाविरुद्ध त्यांना मारा करावा लागणार असल्याने हे आव्हान तितके सोपे जाणार नाही. हवामानाचा विचार करता पावसाची शक्यता असून आरसीबी आणि त्यांच्या चाहत्यांना ही गोष्ट मुळीच आवडणार नाही.
संघ : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), आकाश दीप, फिन अॅलन, अनुज रावत, अविनाश सिंग, मनोज भंडागे, मायकेल ब्रेसवेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, सिद्धार्थ कौल, विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, वेन पारनेल, हर्षल पटेल, सुयश प्रभुदेसाई, राजन कुमार, शाहबाज अहमद, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, सोनू यादव, विजयकुमार वैशाख, केदार जाधव.
गुजरात टायटन्स : हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, रशिद खान, राहुल तेवतिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, यश दयाल, प्रदीप सांगवान, दर्शन नलकांडे, जयंत यादव, आर. साई किशोर, नूर अहमद, दासून शनाका, ओडियन स्मिथ, के. एस. भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, जोशुआ लिटल आणि मोहित शर्मा.









