भगवान व्यासांनी दिलेल्या दिव्य दृष्टीचा उपयोग करून, युद्धभूमीवर काय चालले आहे त्याचे प्रत्यक्ष वर्णन संजय धृतराष्टाला सांगत आहे. तो म्हणाला, पांडवसैन्याचे अक्राळविक्राळ स्वरूप दुर्योधनाने बघितले तेव्हा त्याला असे वाटले की, आता महाप्रलय होणार असून काळ त्यासाठी तोंड उघडून बसला आहे परंतु ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपांना सिंह मुळीच किंमत देत नाही. त्याप्रमाणे त्याने त्या सैन्याच्या महाभयंकरतेची बिलकुल पर्वा केली नाही. तो द्रोणांजवळ येऊन त्यांना म्हणाला, हे पांडवांचे हे सैन्य कसे उसळले आहे पहा. हुशार अशा द्रुपदपुत्र धृष्ट्याद्युम्नाने सैन्याचे हे नानाप्रकारचे व्यूह डोंगरी किल्ल्याप्रमाणे सभोवार रचलेले आहेत. ह्या अर्थाचा गुरूजी तुमचा शिष्य शाहणा द्रुपदात्मज । विशाळ रचिले त्याने पहा पांडव सैन्य हे ।। 3 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार तो उपहासाने द्रोणाचार्यांना म्हणाला, ज्याला तुम्ही शिक्षण देऊन शहाणे केलेत तो तुमचा शिष्य तुमच्यावरच उलटला आहे आणि तुमच्याविरुद्ध लढण्यासाठी हा सैन्यसिंह त्याने उभा केला आहे. शस्त्रास्त्रात प्रवीण व क्षात्रधर्मात निपुण असलेले हे असामान्य योद्धे आहेत. असे म्हणून त्याने पांडवांच्या सैन्यातील मोठमोठ्या योद्ध्यांची नावे घेतली. तो म्हणाला,
ह्यात शूर धनुर्धारी युद्धी भीमार्जुनासम । महारथी तो द्रुपद विराट-नृप सात्यकी ।। 4 ।। धृष्टकेतू तसा शूर काश्य तो चेकितान हि । पुरूजित कुंतीभोजीय आणि शैब्य नरोत्तम ।। 5 ।। उत्तमौजा हि तो वीर युधामनु हि विक्रमी । सौभद्र आणि ते पुत्र द्रौपदीचे महा-रथी ।। 6 ।।
श्लोकांच्या विवरणात माउली म्हणतात, दुर्योधनाने द्रोणाचार्यांना असे सांगितले की, पांडवांच्या सेनेमध्ये भीमार्जुनांसारखे शूर व महाधनुर्धर योद्धे आहेत. त्यांची नावे सांगतो ऐका. असे म्हणून तो मोठ्या कौतुकाने पांडव सैन्यातील वीरांचा उल्लेख करू लागला. तो म्हणाला, सात्यकी, विराट, महारथी द्रुपद, असे शस्त्रास्त्रात प्रवीण व क्षात्रधर्मात निपुण असलेले असामान्य योद्धे येथे आहेत. जे शक्तीने, मोठेपणाने व पराक्रमाने भीम व अर्जुन यांच्यासारखे आहेत. येथे लढवय्या सात्यकी, विराट, महारथी, श्रेष्ठ आणि शूर असा द्रुपद राजा आहे. धृष्टकेतु, चेकितान, वीर्यसंपन्न काशीराजा, पुरुजित, कुंतिभोज, नरवीर शैब्य, पराक्रमी युधामन्यु, वीर्यशाली उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यु आणि द्रौपदीचे महारथी पुत्र आहेत. अहो सुभद्रेच्या अंत:करणाला आनंद देणारा व प्रतिअर्जुनच वाटणारा तिचा मुलगा अभिमन्यू हाही येथे आहे. असे अनेक महारथी वीर या ठिकाणी जमले आहेत. त्यानंतर त्याने त्याच्या सैन्यातील प्रमुख महायोद्धे कोण आहेत ते सांगितले. तो म्हणाला,
आता जे अमुच्यातील सैन्याचे मुख्य नायक । सांगतो जाणण्यासाठी घ्यावे लक्षात आपण ।।7।। स्वत: आपण हे भीष्म यशस्वी कृप कर्ण तो । अश्वत्थामा सौमदत्ति जयद्रथ विकर्ण हि ।। 8।।
अनेक दुसरे वीर माझ्यासाठी मरावया । सजले सर्व शस्त्रांनी झुंजणारे प्रवीण जे ।। 9 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, दुर्योधनाने पांडव सैन्यातील वीरांचा द्रोणाचार्यांना परिचय करून दिल्यावर त्याच्या सैन्यातील प्रमुख महायोद्ध्यांबद्दल तो सांगत आहे. तुम्ही आणि इतर मुख्य वीरांची नावे आपल्या माहितीकरता सांगतो. प्रतापाने केवळ तेजस्वी सूर्य असलेले गंगापुत्र भीष्म आणि शत्रुरूपी हत्तीला सिंहासारखा वाटणारा वीर कर्ण येथे आहे. ह्यांचे शौर्य असे आहे की, ते एकट्याच्या बळावर ह्या जगाची उत्पत्ती व संहार घडवून आणू शकतात.
क्रमश:








