विशेष प्रतिनिधी / पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक व नवनिर्वाचित खासदार सदानंद शेट तानावडे यांनी गुरुवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतली आणि गोव्यातील विविध विकासकामांबाबत चर्चा केली.
तानावडे हे गोव्यातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेल्यानंतर पंतप्रधानांचे आभार मानण्यासाठी ही सदिच्छा भेट होती. पंतप्रधानांनी खूप चांगले कार्य करा व नावलौकिक मिळवा, असा आशीर्वाद तानावडे यांना दिला. पंतप्रधानांनी यावेळी गोव्याविषयी चौकशी केली. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना देवी श्री लईराई मातेची तसबीर भेट दिली.
तिन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांनाही पुष्पगुच्छ प्रदान केला व त्यानंतर तिन्ही नेत्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सायंकाळी मुख्यमंत्री दिल्लीहून गोव्याला यायला निघाले.









