बसवजयमृत्युंजय स्वामीजी : पुन्हा आंदोलनाची हाक
बेळगाव : शांततेच्या मार्गाने मागील अनेक वर्षांपासून पंचमसाली समाजाचे आरक्षणासाठीचे आंदोलन सुरू आहे. परंतु, मंगळवारी पोलिसांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. हा पोलिसांचा एक पूर्वनियोजित कट होता. साध्या वेशातील पोलिसांनी मारहाण केल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करत पंचमसाली समाजाची माफी मागावी, अशी मागणी कुडलसंगम येथील बसवजयमृत्युंजय स्वामीजींनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली. मंगळवारी झालेल्या लाठीचार्ज घटनेनंतर बुधवारी स्वामीजींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत घडलेल्या घटनेविषयी सविस्तर माहिती दिली.पंचमसाली समाज हा नेहमी शांतताप्रिय समाज म्हणून ओळखला जातो.
परंतु, आंदोलनाला वेगळे वळण लावून या समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे. सिद्धरामय्या सरकारकडून पंचमसाली समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या विरोधात गुरुवार दि. 12 रोजी संपूर्ण राज्यभर भव्य आंदोलन करणार असल्याचे स्वामीजींनी सांगितले. मंगळवारचे आंदोलन शमविणे सरकार तसेच पोलिसांना सहजशक्य होते. परंतु, तसे प्रयत्न झाले नाहीत. आंदोलन जाहीर झाल्यापासून ते चिरडण्याचाच प्रयत्न सरकारकडून सुरू होता. आधी ट्रॅक्टरवर बंदी, त्यानंतर टोलनाक्यानजीक वाहनांची अडवणूक करण्यात आली. तसेच मुख्यमंत्र्यांनी किमान पंचमसाली शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले असते तर हा प्रकार घडलाच नसता. मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्यामुळेच आंदोलन चिघळले आणि त्याला दुसरे वळण मिळाले.
स्वामींचा पोलिसांवर घणाघात
भाजपच्या कार्यकाळातही 6 लाख समाजबांधवांचे मोठे आंदोलन झाले होते. त्यावेळचे एडीजीपी अलोककुमार यांनी हे आंदोलन अतिशय योग्यरीत्या हाताळले. परंतु, मंगळवारी पोलिसांकडून अमानुष पद्धतीने आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. वृद्ध, वकील, महिला यांच्यावरही लाठीचार्ज करण्यात आल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच कोंडसकोप्प येथे धरणे सत्याग्रह करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, मृणाल हेब्बाळकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.









