वृत्तसंस्था / अॅन्टवर्प (बेल्जियम)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या 2024-25 च्या प्रो लीग हॉकी स्पर्धेतील युरोपियन टप्पा भारतीय पुरुष हॉकी संघाने शेवटच्या विजयाने समाप्त केला. या दौऱ्यातील भारतीय हॉकी संघाचा हा एकमेव विजय आहे. शेवटच्या सामन्यात भारताने यजमान बेल्जियमचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यात भारतातर्फे सुखजित सिंगने 21 व्या आणि 35 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदविले. अमित रोहीदासने 36 व्या तर कर्णधार हरमनप्रित सिंगने 59 व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल नोंदविला. यजमान बेल्जियमतर्फे आर्थर डी स्लुव्हेरने 8 व्या मिनिटाला, स्टॉकब्रोक्सने 34 व्या मिनिटाला तर हुगो लेबोचेरीने 41 व्या मिनिटाला असे गोल केले. भारतीय संघातील सुखजित सिंग आणि दिलप्रित सिंग यांचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय हॉकी सामना होता. पुरुषांच्या प्रो लीग हॉकी स्पर्धेत भारताने गुणतक्त्यात सातवे स्थान मिळविले. या सामन्यात सुखजित सिंगला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या लढतीतील पहिल्या 15 मिनिटांच्या सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. पण बचावफळी भक्कम असल्याने या कालावधीत बेल्जियमचा एकमेव गोल नोंदविला गेला. खेळाच्या दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारतातर्फे सुखजित सिंगचा एकमेव गोल नोंदविला गेला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. 20 व्या मिनिटाला भारतालापहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण हरमनप्रित सिंगचा फटका वाया गेला. या सामन्यातील तिसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत 4 गोल नोंदविले गेले. भारतातर्फे सुखजित सिंग आणि अमित रोहीदास यांनी तर बेल्जियमतर्फे स्टोकब्रोक आणि लेबोचेरी यांनी गोल केले. खेळाच्या शेवटच्या सत्रात कर्णधार हरमनप्रित सिंगचा गोल निर्णायक ठरला.









