दक्षिण सोलापूर :
टाकळी येथे सापडलेल्या ७५ वर्षे वयाच्या अज्ञात वृद्धाच्या मृतदेहावर मंद्रूप येथील मुस्लिम तरुणांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या बेवारस मृतदेहावर उस्मान नदाफ व त्यांचे सहकारी सामाजिक जाणिवेतून अंत्यसंस्कार करतात.
टाकळी (ता. दक्षिण सोलापुर) गावचे शिवारातील बोदलप्पा मदगौंडा दिवटे यांच्या शेतात २९ मार्च रोजी चार वाजता अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी ग्रेड पीएसआय संदीप काशीद यांनी पंचनामा केला. तेव्हा हा वृद्ध इसम मयत अवस्थेत पडलेला आढळला. त्याच्या अंगातील शर्ट व धोतर याची झडती घेतली मात्र ओळख पटविणारा एकही पुरावा आढळून आला नव्हता. त्यामुळे याची मंद्रुप पोलीस ठाण्यात आकस्मिक मयत म्हणून नोंद करण्यात आली.
मंद्रुप पोलिसांनी सदर मयताच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. उष्माघात व भूकबळीने मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांनी शोध घेवूनही त्याची ओळख पटली नाही. त्यामुळे आज पाचव्या दिवशी सदरच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.
- मुस्लिम तरुणांनी केले अंत्यसंस्कार
मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयातील शवागृहातून वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड, पोलीस शिपाई संदीप काळे, विशाल कर्नाळकर यांच्या उपस्थितीत बाहेर काढला. मुस्लिम समाजाचे तरुण उस्मान नदाफ, आसिफ शेख, सैफन नदाफ, आरिफ नदाफ यांनी तिरडी बांधली. त्यांना अनिल टेळे, सिद्धाराम कुंभार, मल्लिकार्जुन जोडमोटे, अमोगसिध्द लांडगे, बबलू शेख, शिवराज मुगळे यांनी मदत केली. त्यानंतर मंद्रूप-निंबर्गी रस्त्यावरील स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला. यावेळी हिंदू पद्धतीने सर्व धार्मिक विधी करण्यात आले. उस्मान नदाफ मित्रपरिवारांनी तिसऱ्यांदा बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मुस्लिम तरुणांनी सामाजिक जाणिवेतून केलेल्या या कामाचे कौतुक होत आहे.








