केळशीतील प्रसिद्ध धबधब्याची दुर्दशा
वार्ताहर /झुआरीनगर
एकेकाळी प्रसिद्ध असलेला केसरव्हाळ धबधबा नामशेष होण्याच्च्या मार्गावर आहे. केळशी पंचायत क्ष्sत्रातील या धबधब्याची दुर्दशाच आलेली आहे. धबधब्याच्या संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना झालेली नसल्याने या धबधब्याचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या केसरव्हाळ धबधब्यावर उन्हाळय़ात खूप गर्दी पडायची. आंगोळीसाठी हा धबधबा खूप प्रसिद्ध होता.
कुठ्ठाळीबरोबरच आसपासच्या भागातील लोक या धबधब्यावर पिकनिकसाठी यायचे. या धबधब्याचे पाणी बहुगुणी असल्याचे लोक सांगतात. त्यामुळे अबाल वृद्ध सर्वच या धबधब्यावर स्नान करण्यासाठी यायचे. उन्हाळय़ात रविवारी व सुट्टीच्या दिवसात खूप मोठी गर्दी असायची.
त्यावेळी तीन ठिकाणाहून पाणी पडायचे. पाण्याचा प्रवाहही मोठा होता. परंतु आज हा धबधाब टिपटिप झिरपत आहे. धबधब्याच्या सभोवताली असलेली मोठमोठी झाडे कोसळलेली आहे. तसेच दरड कोसळून धबधब्याचे मूळ पाण्याचे स्त्रोत्र बंद झालेले आहेत. दरवर्षी पावसात या धबधब्याच्या आजूबाजूचा भाग कोसळत आहे. वेर्णा औद्योगिक वसाहतीच्या अवघ्या काही किलोमीटर अंतरावर हा धबधबा असल्याने या भागात राहणारे भाडेकरू स्नानासाठी व कपडे धुण्यासाठी या धबधब्यावर येतात. या निर्जनस्थळी बियर, दारूच्या पाटर्य़ाही होतात. या भागात सर्वत्र झाडे झुडपे वाढल्याने इतर गैरकृत्यासाठीही ही जागा सोयीची ठरत आहे. अशा अनेक कारणामुळे येथील वातावरण सध्या दुषीत झालेले आहे.
सध्या तेथील पायऱया सोडल्यास सर्व काही नष्ट झालेले दिसून येते. या परिसरात दाट झाडे वाढलेली आहेत. धबधब्याच्या संवर्धनासाठी माजी आमदार एलिना साल्ढाणा प्रयत्नशील होत्या. जल संसाधन खात्यामार्फत धबधब्याचे संवर्धन तसेच संरक्षक भिंत व या भागाच्या सुशोभिकरणासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. सामाजिक माध्यमांती प्रसिध्दी पाहून गोव्यातील नव्हे तर बाहेरील राज्यातील पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी येतात. परंतु या इथे आल्यावर त्यांची निराशाच होते.
केसरव्हाळ धबधब्याच्या या समस्येविषयी केळशीच्या सरपंच मारिया कुलासो यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हा धबधबा केळशीवासीयांसाठी खूप महत्वाचा असून त्यांचे संवर्धन होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. या धबधब्याचे पाणी इतरत्र केळशीतील शेती बागायतीला उपयोगी पडते. या धबधब्यावर अजूनही केळशी, कुठ्ठाळीतील लोक स्नानासाठी जातात व हा धबधबा म्हणजे या दोन्ही गावाची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
जलस्त्रोत खात्यातर्फे वाकलेली मोठमोठी झाडे कापून इतर काही कामेही करण्यात आलेली आहेत. धबधब्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने उर्वरीत कामासाठीही जलस्तोत्र खात्याशी पत्रव्यवहार केलेला असल्याचे सरपंच मारिया कुलासो यांनी सांगितले. या भागाचा विकास करण्याच्या दृष्टीने पर्यटन प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव यापूर्वी मांडण्यात आला होता. परंतु या विकासाच्या नावाखाली येथील नैसर्गिक सौदर्य तसेच पर्यावरण नष्ट होण्याची भीती असल्याचे सरपंच कुलासो यांनी पुढे सांगितले.









