वजन कळल्यावर व्हाल चकित
मालवाहतुकीसाठी ट्रक सर्वात उपयुक्त साधन आहे. तुम्ही अनेकदा मोठे ट्रक पाहिले असतील. परंतु सर्वात मोठा ट्रक कोणता या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहित असेलच असे नाही. जगातील सर्वात मोठ्या ट्रकसमोर अन्य ट्रक लहान मुलांप्रमाणे वाटू लागतात.
बेलारुसच्या कंपनीने जगातील सर्वात मोठा ट्रक निर्माण केला असून त्याचे नाव ‘बेलाझ 75710’ आहे. सोव्हियत काळापासूनच बेलारुसची बेलाझ कंपनी अत्यंत मजबूत ट्रक निर्माण करण्यासाठी ओळखली जाते. सोव्हियत महासंघाच्या विघटनानंतर या कंपनीने स्वत:च्या तंत्रज्ञानाला प्रगत केले आणि पाश्चिमात्य कंपन्या म्हणजेच कॅटरपिलर, लेहबर, बुसायरसला मागे टाकत सर्वात मोठा ट्रक निर्माण करण्याची कामगिरी केली.
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव
बेलाझ कंपनीने दीर्घकाळापर्यंत हा विक्रम स्वत:च्या नावावर ठेवला आहे. बेलाझ 75710 ट्रकचे वजन 360 टन आहे. यात 8 विशाल आकाराचे टायर लावण्यात आले असून यातील प्रत्येक टायरचे वजन 5500 किलो आहे. या ट्रकची किंमत जवळपास 50 कोटी रुपये आहे.
60 किमी प्रतितासाचा वेग
हा ट्रक 20 मीटर लांब, 9.7 मीटर रुंद आणि 8.2 मीटर उंच आहे. हा ट्रक 450 टन वजन वाहून नेऊ शकतो असा कंपनीच दावा आहे. परंतु 2014म ध्ये या ट्रकने 503 टन वजन वाहून नेत गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला होता. रिकामी असताना हा ट्रक 50 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावू शकतो. तर भारासह हा ट्रक 45 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने अंतर कापू शकतो.









