युक्रेनमध्ये पूराचा धोका : अध्यक्ष झेलेंस्कींनी बोलाविली आपत्कालीन बैठक
वृत्तसंस्था/ कीव्ह
रशियासोबतच्या युद्धादरम्यान मंगळवारी युक्रेनमधील सर्वात मोठे धरण नष्ट झाले आहे. उत्तर युक्रेनमध्ये असलेल्या या धरणाचे नाव काखोवका होते. हे धरण नष्ट करण्याप्रकरणी रशिया आणि युक्रेनने परस्परांवर आरोप केले आहेत. धरणाच्या भिंतीवर हल्ला करण्यात आल्यावर झालेला पाण्याचा विसर्ग आता मैदानी भागात पोहोचला आहे. धरणाची भिंत तुटल्याने होणारे नुकसान पाहता युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी तातडीची बैठक बोलाविली आहे.
पूराच्या भीतीमुळे धरणाखालील गावांना रिकामी करविण्यात येत आहे. खरसोनला अलर्टवर ठेवण्यात आले आहे. तर रशियन वृत्तसंस्थेनुसार 80 गावांना पूराचा धोका आहे. युक्रेनमध्ये हे धरण सोव्हियत महासंघाच्या राजवटीदरम्यान 1956 मध्ये तयार करण्यात आले होते. नाइपर नदीवर उभारलेले हे धरण 3.2 किलोमीटरच्या भागात फैलावलेले आहे.
काखोवका धरणावर रशियाने हल्ला केल्याचा दावा युक्रेनच्या उत्तर कमांडच्या सैन्याधिकाऱ्यांनी मंगळवारी केला आहे. तर झेलेंस्की यांनी धरणावरील हल्ल्यानंतर तातडीची बैठक बोलाविली आहे. तर धरण रशियाच्या कब्जातील भागात आहे. युक्रेनच्या हल्ल्यात हे धरण नष्ट झाल्याचे रशियाच्या सैन्याचे म्हणणे आहे. काखोवका धरणातूनच क्रीमिया आणि जापरोजिया आण्विक प्रकल्पात पाण्याचा पुरवठा करण्यात येतो.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात आता रशिया आणि युक्रेन आमनेसामने येणार आहेत. रशिया अनेक वर्षांपासून युक्रेनियन फुटिरवाद्यांना समर्थन देत असून यामुळे युक्रेनमध्ये हल्ले होत असल्याचा युक्रेनचा आरोप आहे. या पूर्ण प्रकरणी द हेगमध्ये दोन्ही देश स्वत:चा युक्तिवाद मांडणार आहेत. यासंबंधीचा खटला युक्रेनने युद्धाच्या 5 वर्षांपूर्वी दाखल केला होता. 2022 मध्ये युद्धानंतर युक्रेनने रशियाच्या विरोधता आंतरराष्ट्रीय न्यायालयात आणखी काही याचिका दाखल केल्या आहेत.
17 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने युक्रेनमधील युद्धगुन्ह्यांसाठी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. पुतीन हे युक्रेनियन मुलांचे अपहरण तसेच डिर्पोटेशनच्या गुन्ह्dयासाठी जबाबदार असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.