इराक या देशातील नजफ शहरात जगातील सर्वात मोठे कब्रस्तान आहे. त्याचे नाव ‘वादी अल् सलम’ असे आहे. हे शहर मुस्लीमांमधील शिया पंथियांचे पवित्र स्थान आहे. त्यामुळे येथे शिया मुस्लीम आपल्या मृत नातेवाईकांचे दफन करण्यासाठी त्यांचे मृतदेह घेऊन येत असतात. येथे दफन होणे भाग्याचे मानले जाते. इराकमधील अनेक शियापंथीय आपला मृत्यू झाल्यानंतर याच कब्रस्तानात आपल्या मृतदेहाचे दफन करावे, अशी इच्छा लिहून ठेवतात. येथे प्रतिदिन 200 हून अधिक दफनविधी होतात, अशी माहिती देण्यात आली आहे.
याच कब्रस्तानाला शियापंथिय इतके प्राधान्य का देतात याचे कारणही आहे. या स्थानाच्या जवळच शियांचे पहिले इमाम अली बिन अबी तालीब यांचा मकबरा आहे. मोहम्मद पैगंबर यांचे ते जावई होते. त्यामुळे त्यांच्या मकबऱ्याजवळ आपले दफन व्हावे, असे अनेक शिया मुस्लीमांना वाटते. सध्या या नजफ शहरावर इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचे नियंत्रण आहे. ही सुन्नी मुस्लीमांची संघटना असून शिया मुस्लीमांशी तिचे पटत नाही. अनेक शिया मुस्लीम या संघटनेविरोधात लढण्यासाठी अर्धसैनिक दलांमध्ये भरती होतात. त्यावेळी ते अली तालिब यांच्या मकबऱ्यात जाऊन प्रार्थना करतात. युद्धात मृत्यू झाल्यास दफन याच वादी अल् सलम कब्रस्तानात व्हावे, अशी अंतिम इच्छा ते या मकबऱ्यात प्रगट करतात. इतके या कब्रस्तानाचे महत्व शिया मुस्लीमांसाठी आहे. या कब्रस्तानाचे क्षेत्रफळ 35 चौरस किलोमीटर असल्याचे अनुमान आहे. येथे आतापर्यंत लक्षावधी पार्थिवांचे दफन करण्यात आले आहे. आता ही जागा कमी पडू लागली आहे. येथे दफन करण्यासाठी 3.3 लाख रुपये इतका खर्च येतो.









