दक्षिण अमेरिकेत आढळतो कोंडोर
दक्षिण अमेरिकेच्या देशांमध्ये अँडीज पर्वतरांगांमध्ये एक पक्षी आढळून येतो, हा पक्षी इतका मोठा आहे की त्याला उडणारा प्राणीही म्हटले जाते. या पक्ष्याचे आयुर्मान 75 वर्षांपर्यंत असते. तसेच या पक्ष्याला कोंडोर हे नाव प्राप्त आहे. या पक्ष्याने स्वत:च्या पंखांचा फैलाव करताच तो 11 फुटांइतका होतो. एंडियन कोंडोर नावाच्या या पक्ष्याचे वजन 15 किलोपर्यंत असते. कधीकधी हा पक्षी स्वत:च्या वजनाहून अधिक अन्न ग्रहण करतो, अशा स्थितीत तो आराम करणे पसंत करत असतो. स्वत: ग्रहण केलेले अन्न पचल्यावरच तो पुन्हा उ•ाणाचा प्रयत्न करतो. सर्वसाधारणपणे हा पक्षी अँडीज पर्वतरांगेच्या परिसरात आढळून येतो. अँडीज पर्वतरांगा जगातील सर्वात लांब पर्वतरांगा असून ती अनेक देशांमध्ये फैलावलेली आहे. यात दक्षिण अमेरिकेतील 7 देश मोडतात, यात व्हेनेझुएला, कोलंबिया, इक्वेडोर, पेरू, बोलिविया, चिली आणि अर्जेंटीना यांचा समावेश आहे. हा विशाल आकाराचा पक्षी स्वत:चे घरटे अत्यंत उंचीवर तयार करतो. काही लोक याचा आकार पाहून याला जगातील सर्वात मोठा उडणारा प्राणीही म्हणतात.
या पक्ष्याच्या नराच्या मानेवर पांढऱ्या रंगाचा पट्टा असतो. सर्वसाधारणपणे हा पक्षी अर्जेंटीना आणि पेरू या देशांमध्ये आढळतो. तसेही या पक्ष्यांची संख्या घटू लागल्याने त्यांना विलुप्तप्राय प्रजातींमध्ये समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे. जंगलतोड तसेच शिकारीमुळे या पक्ष्यांवर मोठे संकट ओढवले आहे. एंडीयन कोंडोर सर्वसाधारणपणे उंच भागात राहतात, ते समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचलेल्या मृत माशांना फस्त करतात. यामुळे या पक्ष्यांना पर्यावरण साफ ठेवणारा पक्षी म्हटले जाते. अन्नाच्या शोधात हा पक्षी दररोज सुमारे 120 मैलापर्यंत प्रवास करतो. परंतु हा पक्षी अन्य पक्ष्यांच्या घरट्यांमध्ये शिरूनही स्वत:चा आहार मिळवित असतो. एंडीयन पर्वतरांगांवर राहणारे लोक या पक्ष्यांना अमर पक्षी मानतात. परंतु काही लोक या पक्ष्यांना अशुभ मानून त्यांना मारून टाकत असतात. या पक्ष्यांचा प्रजनन दर कमी असतो. 5-6 वर्षे वयानंतरच हा पक्षी प्रजननास सक्षम होतो. या पक्ष्यांना बैलांच्या पाठीवर बांधून पेरू तसेच अर्जेंटीनामध्ये शर्यत आयोजित केली जाते. परंतु या स्पर्धांवर आता बंदी घातली जात आहे. दक्षिण अमेरिकेतील इंका समुदाय कोंडोर पक्ष्याला देवाचा दर्जा देतो.









