चांद्रयान-3 मोहिमेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा : यानाचा चंद्राच्या अंतिम कक्षेत प्रवेश : भारताच्या मोहिमेकडे जगाचे लक्ष
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष आता इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेकडे लागले आहे. चांद्रयान-3 अंतिम टप्प्यात पोहोचले असून बुधवारी सकाळी इस्रोने पुन्हा एकदा चंद्राच्या पृष्ठभागापासून अंतर कमी करण्यासाठी कक्षा कमी केली. आता गुरुवार, 17 ऑगस्ट रोजी प्रोपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगळे केले जातील. चांद्रयान-3 सध्या 153 किमी × 163 किमीच्या पाचव्या कक्षेत ठेवण्यात आले असून आता आपल्या मिशनच्या अगदी जवळ पोहोचले आहे.
चांद्रयान-3 या वषी 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले. यानंतर ते टप्प्याटप्प्याने यशस्वी वाटचाल करत आहे. चांद्रयान-3 सध्या पाचव्या कक्षेत ठेवण्यात आले आहे. या प्रक्रियेचे नाव मॅन्युव्हर असे आहे. याअंतर्गत अंतराळ यानाच्या इंजिनचा वापर करून, ते एका विशिष्ट मार्गाने ढकलले जाते. या प्रक्रियेमुळे त्याचा मार्ग अधिक गोलाकार बनतो. आता हे यान सॉफ्ट लँडिंगसाठी तयार होईल. लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाल्यानंतर आणि अंतराळयान 100 किमी × 30 किमीच्या कक्षेत पोहोचल्यानंतर सॉफ्ट लँडिंगची प्रक्रिया सुरू होते. लँडर आपल्या थ्रस्टर्सचा वापर करून चंद्राच्या पृष्ठभागावर सुमारे 30 किमी उंचीवर पोहोचल्यानंतर त्याच्या सुरक्षित लँडिंगसाठी अचूक नियंत्रण आणि नेव्हिगेशन आवश्यक आहे.
चंद्रयान-3 चा लँडर विक्रम 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल. विशेष म्हणजे, इंजिन बिघडले तरी अशा परिस्थितीतही चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग होईल. सर्व सेन्सर आणि दोन इंजिन काम करू शकले नसले तरी सॉफ्ट लँडिंग सुनिश्चित केले जाईल, असे इस्रो प्रमुखांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र, सॉफ्ट लँडिंग यशस्वी करून मोहीम 100 टक्के फत्ते करण्यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ आपली सर्व क्षमता आजमावत आहेत. विक्रमला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचे सर्वात मोठे आव्हान इस्रोच्या टीमसमोर आहे.
14 जुलै रोजी मिशन चांद्रयान-3 मोहीम सुरू झाली. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर 9 ऑगस्ट, 14 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट रोजी कक्षा बदलण्यात आली. आता अवकाशयान चंद्राच्या जवळ आणण्यात येत असून ते 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याची तयारी इस्रोकडून सुरू आहे.









