परस्पर विरोधात तक्रार, रात्री उशिरापर्यंत बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकासमोर ग्रामस्थांनी मांडले ठाण
बेळगाव : खादरवाडी येथील जमीनविक्री प्रकरण चिघळले असून दोन गटामध्ये सोमवारी रात्री वाद निर्माण झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये काही जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. याची माहिती खादरवाडी ग्रामस्थांना मिळताच गावातील महिलांसह पुरुष मंगळवारी रात्री बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकासमोर जमले. त्यांनी त्याच ठिकाणी ठाण मांडले. जोपर्यंत आमचीही फिर्याद नोंदवून घेऊन त्यांना अटक करत नाही, तोपर्यंत हटणार नाही, असा पवित्रा घेतल्याने मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी अखेर सहा जणांवर रात्री उशिराने गुन्हा दाखल केला आहे. एकूण दोन्ही बाजूच्या 16 जणांवर गुन्हा दाखल झाल्याचे बेळगाव ग्रामीण पोलिसांनी सांगितले.
खादरवाडी येथील देवस्थानची जमीन गावातील काही जणांनी अधिक रकमेने विकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ही जमीन विकताना कोणालाही विश्वासात घेतले नाही. त्यामुळे हे प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून धुमसत होते. सोमवारी रात्री वादावादी झाली. त्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी काही जणांना पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर खादरवाडी संपूर्ण गाव एकत्र आले. त्यानंतर त्या सर्वांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाकडे धाव घेतली.
ग्रामस्थांनी पोलीस स्थानकासमोर दुपारी तीनपासून ठाण मांडले. महिलांसह ग्रामस्थही मोठा सहभाग दर्शविला. जोपर्यंत विरोधकांवर गुन्हा दाखल करणार नाही तोपर्यंत येथून हटणार नाही, असा पवित्रात ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे पोलिसांना अखेर सहा जणांवर गुन्हा दाखल केला. यावेळी महिलांही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्यासह ग्रामीण पोलीस स्थानकाचे एसीपी एस. व्ही. गिरीश हे देखील दाखल झाले. त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा पवित्रा घेतला. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी तुम्ही देखील फिर्याद द्या, त्यानुसार आम्ही कारवाई करू, असे सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी फिर्याद दिली. पोलिसांनी या सर्वांवर भादंवि 143, 147, 148, 307, 323, 504, सहकलम 149 अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर हे आंदोलन मागे घेतले आहे. या आंदोलनामुळे मोठा गोंधळ उडाला होता.









