न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावरील भूखंड, किंमत जाणून घेतल्यावर व्हाल अचंबित
लोक मालमत्ता म्हणून जमीन खरेदी करतात, तेव्हा सर्वसाधारणपणे त्यात घर उभारता येईल किंवा दुकान इत्यादी गोष्टींची निर्मिती करता येईल इतकी मोठी जमीन खरेदी करत असतात. जेव्हा एखादी मोठी कंपनी जमीन खरेदी करते तेव्हा त्यात प्रकल्प किंवा कार्यालय निर्माण करता येईल इतपत तरी जमिनीचा आकार आहे का हे पाहिले जाते. परंतु अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात एक जमिनीचा तुकडा इतका छोटा आहे की तो पिझ्झाच्या स्लाइसइतका वाटू लागतो. आश्चर्याची बाब म्हणजे हा जमिनीचा तुकडा रस्त्याच्या मधोमध असून त्यावर खासगी मालकी आहे.

न्यूयॉर्क शहरात जमिनीचे असे अनेक तुकडे निर्मितीकार्यांमुळे मधोमध्य सोडण्यात आले आहेत. परंतु त्या सर्वांपैकी कुठलाच तुकडा हेस ट्राएंगल इतका छोटा नाही. जमिनीचा हा तुकडा पिझ्झाच्या स्लाइसपेक्षा किंचित मोठा असेल आणि रस्त्याच्या मध्ये असूनही त्यावर खासगी मालकी आहे. ऑडिटी सेंट्रल वेबसाइटच्या अहवालानुसार या ट्राएंगलची कहाणी 1910 पासून सुरू होते.
शहराची रुपरेषा बदलण्यासाठी सुमारे 253 इमारतींना तोंडून तेथे पुन्हा निर्मिती केली जाणार होती. यातील एक 5 मजली अपार्टमेंट होते, ज्याचा मालक डेव्हिड हेस होते. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आणि कायदेशीर लढा देखील दिला परंतु 1913 पर्यंत त्यांच्यासमोरील सर्व कायदेशीर पर्याय संपुष्टात आले. इमारत पाडावी लागली, परंतु 1928 मध्ये हेस यांचे कुटुंबीय मालमत्तेची कागदपत्रे पाहत असताना त्यांना प्रशासनाने एक छोटासा हिस्सा सोडल्याचे आणि त्यावर दावा केला नसल्याचे दिसून आले. त्वरित कुटुंबाने त्या हिस्स्यावर स्वतःचा अधिकार सिद्ध करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आणि त्यांना तो हिस्सा मिळाला. तेव्हा त्यांनी तेथे मोजैकचा एक ट्राएंगल तयार केला आणि त्यावर ‘ही हेस इस्टेटची प्रॉपर्टी असून जी कधीच जनतेच्या वापरासाठी देण्यात आली नव्हती’ असे त्यावर लिहून घेतले होते.
जमिनीची किंमत
ही जमीन केवळ 0.0000797113 एकर आकाराची आहे. सर्वसाधारण लोकांच्या नजरेतून ही जमीन हरविली देखील असू शकते, परंतु त्यावर तयार करण्यात आलेले मोजैकचे डिझाइन याला वेगळय़ाप्रकारे दर्शविते. न्यूयॉर्क शहराने या हिस्स्याला सार्वजनिक मालमत्ता म्हणून दान करण्याचे आवाहन हेस कुटुंबाला केले होते. परंतु त्यांनी प्रशासनाच्या विरोधात लढाईच्या स्वरुपात एक प्रतीक म्हणून त्याला स्थापित केले. 1938 मध्ये हेस ट्राएंगलला व्हिलेज सिगार स्टोअरला 76 हजार रुपयांमध्ये विकले गेले होते. महागाई दर आणि जमिनीचा आकार पाहिल्यास न्यूयॉर्कमध्ये सध्या याची किंमत 13 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. या जमिनीची मालकी 1995 पासून 70 क्रिस्टोफर रिऍलिटी कॉर्पोरेशनकडे आहे.









