प्रतिनिधी/ बेळगाव
सुवर्णविधानसौधमध्ये होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात आंदोलनासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर केला जातो, त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे भाडे वाढविण्यात आले आहे.
सोमवार दि. 4 डिसेंबरपासून अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेऊन जमिनीचे भाडे वाढविण्याची विनंती केली होती. त्यानुसार मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली आहे.
आंदोलनाच्या ठिकाणी तंबू उभारले जातात. यापूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनीला प्रतिगुंठा 1200 रुपये भाडे दिले जात होते. यंदा हलगा येथील 3 एकर 28 गुंठे जमिनीचा वापर विविध आंदोलनांसाठी केला जात आहे. सध्या या जमिनीत पीक आहे. त्यामुळे प्रतिगुंठा 3 हजार रुपये भाडे देण्याची सूचना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली आहे.
मंत्र्यांच्या सूचनेनुसार भाडे वाढविण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. हलगा येथील शेतकऱ्यांनी यासंबंधी लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेऊन भाडेवाढीसाठी निवेदनही दिले होते. याची दखल घेऊन आंदोलनासाठी वापरणाऱ्या जमिनीचे भाडे वाढविण्यात आले आहे.









