झुवारी केमिकल्स कंपनीचा घाट : आमदार सरदेसाई यांची जोरदार टीका
पणजी : राज्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या औदार्यातून कवडीच्या किंमतीत विकत घेतलेली सांकवाळ वेळसांव येथील सुमारे 50 लाख चौ. मी. जमीन आता सोन्याच्या भावात विकण्याचा घाट झुवारी केमिकल्स कंपनीने घातला असून कोणत्याही परिस्थितीत त्यांचे मनसुबे साध्य होऊ देणार नाही, असा पवित्रा गोवा फॉरवर्ड पक्षाने घेतला आहे. बुधवारी पणजीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई बोलत होते. त्यावेळी दीपक कळंगुटकर आणि मारियानो राड्रिगीश यांची उपस्थिती होती.
तब्बल 2400 फ्लॅटचा महाप्रकल्प
राज्यात औद्योगिकरण वाढावे या उदात्त हेतूने भाऊसाहेब बांदोडकर यांनी सांकवाळ येथील तब्बल 50 लाख चौरस मीटर जमीन कवडीमोल किंमतीत झुवारी कंपनीला दिली होती. मात्र, आता याच जमिनीचे तुकडे तुकडे पाडून गोव्याबाहेरील बिल्डर लॉबीच्या घशात घालण्याचे षडयंत्र त्या कंपनीने आरंभले आहे. त्यापैकी 4 लाख चौ. मी. जमीन कर्नाटकातील ‘पूर्वांकारा’ नामक बांधकाम कंपनीला विकण्यात येणार असून तेथे तब्बल 2400 फ्लॅटचा मेगा प्रकल्प येत असल्याची माहिती मिळाल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. झुवारीने आरंभलेल्या या जमीन विक्री व्यवसायाला स्थानिकांनी जोरदार विरोध दर्शविला असून आपण स्थानिकांसोबत राहणार असल्याचे सरदेसाई यांनी जाहीर केले. हे जमीन विक्री प्रकरण यापूर्वीही उजेडात आणताना त्यात 50 हजार कोटींचा घोटाळा असल्याचे आपण म्हटले होते याची आठवण सरदेसाई यांनी करून दिली.
गोव्याच्या साधनसुविधा, संस्कृतीवर परिणाम
आता त्यांनी विक्रीस काढलेल्या 4 लाख चौ मी जमिनीत येणाऱ्या प्रकल्पात गोव्याबाहेरीलच लोक ‘सेकंड होम’ म्हणून फ्लॅट खरेदी करणार आहेत. तरीही त्या प्रकल्पासाठी वीज, पाणी आणि अन्य सुविधा मात्र राजातीलच वापरण्यात येणार आहेत. त्याशिवाय या प्रकल्पात जास्त करून गोव्याबाहेरीलच लोक राहणार असल्यामुळे येथील कला, संस्कृती, भाषा यांचा ऱ्हास होणार आहे, त्यामुळे साहजिकच स्थानिकांचा कोणताही फायदा होणार नाही. म्हणुनच अशा प्रकल्पांना आमचा विरोध असेल, असे सरदेसाई यांनी सांगितले.
बिल्डर लॉबिच्या भल्यासाठी नेत्यांचा खटाटोप
सर्वात दु:खद आणि खेदजनक गोष्ट म्हणजे अशा प्रकल्पांचे अप्रत्यक्ष समर्थन करून व बिल्डर लॉबीचे भले व्हावे यासाठी राज्यातील काही नेते दिल्लीत जाऊन केंद्रीय नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यापेक्षा ही जमीन बाहेरच्यांना न विकता स्थानिकांना विकावी किंवा सरकारने ताब्यात घेऊन गोव्यासाठी वापरावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.
झुवारी परिसर हा निर्बंधित विभाग
दरम्यान, झुवारीला देण्यात आलेली जमीन ही ‘निर्बंधित विभागात’ येत असून काही वर्षांपूर्वी वायुगळती होऊन हजारो लोकांचे बळी घेणाऱ्या युनियन कार्बाईड पेक्षा हा प्रकल्प अधिक घातक आहे. त्यामुळे अशा प्रकल्पाच्या परिसरात लोकवस्ती आणणे धोक्याचे ठरणार असल्याने सरकारने सदर जमीन विक्रीवरही निर्बंध घालावे, असेही सरदेसाई म्हणाले.
मंत्री आठवलेना बडतर्फ करावे
आपल्या बेजबाबदार वक्तव्याने एसटी समाजाचा तसेच मूळ गोमंतकीयांचा अपमान करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे. केंद्रातून येणारे मंत्री अथवा अधिकाऱ्यांबाबत गोमंतकीयांनी सदैव जागृत राहिले पाहिजे. यापैकी बरेचजण एक तर पिकनिकच्या उद्देशाने येथे येतात, ढोसतात, मौजमजा करतात व जाताना काहीबाही बरळून जातात, असेही ते म्हणाले.









