सद्या तात्पुरती व्यवस्था कुर्टी येथील कृषी मार्केट यार्डात : स्वतंत्र इमारत असूनही वेळोवेळी डागडुजी का नाही?
फोंडा : फोंडा तालुक्यातील बेतकी-खांडोळा येथे एका घराच्या शेडवर जंगली झाड कोसळून मायलेकाला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच फोंडा तालुक्यातील सदर-फोंडा येथील विभागीय कृषी कार्यालयाचे छप्पर कोसळले. सुदैवाने कार्यालय बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. सोमवारी 12 रोजी हा प्रकार उघडकीस आला. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सद्या विभागीय कृषी कार्यालय कुर्टी-फोंडा येथील मार्केट यार्डाच्या इमारतीत महिल्या मजल्यावर हलविण्यात आलेले आहे. प्राप्त माहितीनुसार कृषी विभागाचे छप्पर कोसळण्याची घटना शुक्रवारी 9 जून रोजी मध्यरात्री घडली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कृषी खात्याची पोर्तुगीजकालीन इमारत आहे. यापुर्वी निम्या भागाची डागडुजी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. कौलारू छप्पर असलेल्या कार्यालयात एकूण सात खोल्या एकूण विभाग कार्यरत होते. सुदैवाने या घटनेवेळी कार्यालयात कोणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला. फोंडा तालुक्यातील प्रियोळ, मडकई, शिरोडा व जुन्या फोंडा मतदारसंघाचे कार्यक्षेत्र कृषी विभागाच्या हद्दीत येते. एकूण 19 पंचायतीच्या नागरिकांना सेवा देण्यात येत आहे. या कार्यालयात सुमारे 25-30 कर्मचारी व अधिकारी काम करतात.
सद्या ताप्तुरती सोय कुर्टी येथील कृषी पणन केंद्रात
जुन्या जीर्ण झालेल्या कार्यालयात मात्र कुठल्याही प्रकारची अत्याधुनिक सेवा नव्हती, पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था शेतकऱ्यांना व्यवस्थित नसायची. इमारतीचे छतही पुर्णत: निकामी झाले आहे. कधी कोणाच्या अंगावर कोसळेल सांगता येत नव्हते. सुरवातीपासून या इमारतीचा ताबा कृषी खात्याकडे असल्यामुळे कृषी विभागाने दुरूस्ती करणे गरजेचे होते. इमारतीच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले यातून स्पष्ट दिसून येते. अशा परिस्थित कारभार हाकणाऱ्या अधिकाऱ्यासह कामानिमित्त येणाऱ्या शेतकरी व नागरिकांचाही जीवाला धोका निर्माण केला होता. छप्पर कोसळल्यानंतर महत्वाचे सर्व दस्ताऐवज व फाईली सुरक्षित ठिकाणी हलवून सद्या कृषी खात्यातर्फे भाडेपट्टीवर तात्पुरती पर्यायी व्यवस्था कुर्टी फोंडा येथील कृषी पणन केंद्राच्या पहिल्या मजल्यावर केलेली आहे. नवीन विभागीय कृषी कार्यालयाची इमारत उभारेपर्यत मार्केट यार्डातच मुक्काम वाढण्याची चिन्हे दिसत आहे.
स्वतंत्र इमारत असूनही वेळोवेळी डागडुजी का केली नाही?
कौलारू नळ्याचे कार्यालय सुमारे 30 वर्षापुर्वीचे असल्याची माहिती प्राप्त होत आहे. सुमारे चार हजार चौ.मिटर जागेत कृषी खात्याची स्वतंत्र इमारत आहे. त्याशिवाय हल्लीच निवासी गाळ्याचे बांधकाम केल्याचे आढळते. तसेच निवसी गाळयात काही कर्मचारीही वास्तव्यास आहेत. तरीही येथील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी कार्यालयाच्या दुरूस्तीसाठी फायली पुढे का सरकल्या नाहीत ? की सगळेजण जीर्ण झालेली कार्यालय कधी कोसळणार याची वाट बघत होते का असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी विभागीय कृषी कार्यालयाचे अधिकारी संतोष गावकर यांच्याकडे धारबांदोडा व फोंडा अशा दोन कार्यालयाचा ताबा आहे. छत कोसळल्यानंतर शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कुर्टी फोंडा (एएमपीसी) मार्केट यार्डाट विभागीय कार्यालय हलविण्यात आल्याची माहिती दिली.









