दुरुस्तीकडे दुर्लक्ष, डागडुजी करण्याची मागणी
वार्ताहर /कणकुंबी
बेळगाव-पणजी, जांबोटी ते चोर्लापर्यंतच्या रस्त्याची वाताहत झालेली असून मागील वषी पावसाळय़ात पडलेले खड्डे यावषीसुद्धा जसेच्या तसेच असल्याने वाहनधारकांना खड्डे चुकविण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागत आहेत. प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
चोर्ला रस्त्यांपैकी बेळगाव ते किणये हद्दीपर्यंत रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. परंतु खानापूर तालुक्मयाच्या हद्दीतील उचवडेपासून ते चोर्लापर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असुनसुद्धा काम हाती घेतलेले नाही. पावसाळय़ापूर्वी हे खड्डे बुजविणे गरजेचे होते. गेल्यावषी पावसाळय़ात चिखले फाटय़ाच्या उतरतीला तसेच बेटणे, पारवाड, वनखात्याच्या नर्सरीजवळ व चोर्ला गावाजवळ रस्त्यावर पडलेले खड्डे प्रशासनाने केवळ माती दगड घालून बुजविले होते. त्यातील माती व दगड निघून गेल्याने पुन्हा तेच खड्डे यावषी मोठे झाले आहेत. त्यामुळे पावसाच्या सुरुवातीलाच रस्त्याची वाताहत झाली आहे. पावसाळय़ात हा रस्ता वाहतुकीसाठी निश्चितच बंद होणार आहे. त्यामुळे गोवा राज्याशी संपर्क तुटणार आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक ठिकाणी लहान-मोठे अपघात होत आहेत. प्रशासनाने निदान तात्पुरती तरी डागडुजी करून रस्ता वाहतुकीसाठी योग्य करावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.









