प्रसिद्ध वितरक एम. बी. देसाई अॅण्ड सन्सने उपलब्ध केला आंबा : डझनाला तब्बल 4500 रुपये बोली
बेळगाव : नूतन वर्षाच्या सुरुवातीलाच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बुधवारी हापूस बेळगावात दाखल झाला. आंब्याचे अधिकृत वितरक एम. बी. देसाई अँड सन्सने तो उपलब्ध केला. कोकणातील बागायतदार जगदीश गावकर, संदीप लोके, अनिकेत अमराडकर यांच्याकडून सदर आंबा दाखल झाला. कोकणातील हापूस आंबा दाखल होताच देसाई अँड सन्सतर्फे पहिली लिलाव प्रक्रिया पार पडली व महमूदखान खानजादे, नूर हंचिनमनी, अमजद पठाण यांनी तो लिलावात खरेदी केला. त्यामध्ये दोन प्रकारच्या हापूस आंब्यांचा लिलाव झाला. अर्ध्या डझनला 1000 रुपयांपासून बोली लावण्यात आली. ती वाढत जाऊन 2700 रुपयाला होलसेल खरेदी झाली आणि एक डझनाला 2500 रुपयांपासून बोली लावण्यात आली ती वाढत जाऊन 4500 रुपयाला होलसेल खरेदी झाली. या खरेदीचे उपस्थित व्यापाऱ्यांकडून टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले तसेच प्रत्येक वषी सर्वप्रथम एम. बी. देसाई अँड सन्स यांच्याकडून आंबा बेळगाव मार्केटमध्ये दाखल करण्यात येतो, म्हणून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सुरुवातीला एम. बी. देसाई अँड सन्सचे संचालक संदीप देसाई यांनी हापूस आंब्याचे पूजन केले व लिलाव प्रक्रिया झाली. बेळगाव मध्ये दरवषी 15 फेब्रुवारीपासून आंब्यांची आवक सुरू होते. यावषी आठ दिवस आधीच हापूस आंबा दाखल झाला असून तो बेळगावकरांना चाखायला मिळणार आहे.










