अध्याय अकरावा
जिवंतपणीच मोक्षस्थिती अनुभवणे म्हणजे आहे त्या स्थितीत कोणताही बदल नको अशा मन:स्थितीत राहून कैवल्यपद प्राप्त करून घेणे. कैवल्यावस्था प्राप्त करून घेण्यासाठी ध्यानधारणा व समर्पणयुक्त कर्म, भक्ती, मंत्रतंत्र हे दोन मार्ग बाप्पांनी सांगितले. पहिल्या मार्गाने जाणे मायेच्या प्रभावाखाली वावरत असलेल्या सामान्य माणसाला सहजी शक्य होत नाही, म्हणून सामान्य मनुष्यालासुद्धा कैवल्यावस्था प्राप्त करून घेता यावी या उद्देशाने बाप्पांनी समर्पण मार्गाचा उपदेश केलेला आहे. त्यानुसार वागल्यास भक्ताच्या मनातली ‘मी कर्ता आहे’ ही भावना लोप पावते आणि त्याला जोडून येणारे कामक्रोधादि विकार आपोआप नाहीसे होतात. असे भक्त ईश्वराचे लाडके होतात आणि ते आपणहून त्यांना कैवल्यपद प्रदान करतात. बाप्पा राजाला पुढे म्हणाले, वरेण्या, तू माझा लाडका आहेस म्हणून तुला मी हा योग सांगितला आहे. ह्या योगाचा उपयोग करून घेऊन परमसिद्धी प्राप्त करून घे. बाप्पानी सांगितलेला योग वरेण्याने कसा साधला याबाबत व्यास मुनी काय सांगतात तो श्लोक आपण अभ्यासत आहोत. तो श्लोक असा,
इति तस्य वचऽ श्रुत्वा प्रसन्नस्य महात्मनऽ । गणेशस्य वरेण्यऽ स चकार च यथोदितम् ।।37।। ह्या श्लोकात व्यास मुनी बाप्पांना महात्मा असे म्हणतात. आत्मा हा ईश्वरी अंश सर्वांच्यात असतो आणि तो सारखाच असतो परंतु महात्मा म्हणजे परमेश्वर होय. त्याला महात्मा म्हणायचं कारण म्हणजे तो सर्वव्यापी आहे. त्यानंच सर्व व्यापलेलं असल्याने इतर सर्व केवळ भास आहेत म्हणजे अस्तित्वात आहेत असं आपलं म्हणायचं एव्हढंच कारण बाप्पाच सर्व व्यापून आहेत म्हंटल्यावर इतरांना जागाच नाही, हेच खरं ! जसं एखादी दगडाची शिळा पूर्णपणे दगडाच्या कणांनी तयार झालेली असल्याने त्यात इतर काही असणं शक्यच नसतं. त्याप्रमाणे सर्व चराचर महात्मा बाप्पांनी व्यापलेलं आहे असं मुनींनी म्हणायचं आहे. सर्वव्यापी अशा महात्मा बाप्पांनी सांगितल्याप्रमाणे वरेण्या राजाने कैवल्यपद प्राप्त करून घेण्यासाठी कशी वाटचाल केली ते पुढील श्लोकात व्यास मुनी सांगत आहेत.
त्यक्त्वा राज्यं कुटुम्बं च कान्तारं प्रययौ रयात् ।
उपदिष्टं यथा योगमास्थाय मुक्तिमाप्तवान्।। 38 ।।
अर्थ- राज्य आणि कुटुंब यांना टाकून तो एकदम वनात गेला. उपदेश केल्याप्रमाणे योगाचे आचरण करून त्याने मुक्ति मिळविली.
विवरण- बाप्पांचा उपदेश ऐकून राजाला एकदम विरक्ती आली. त्याच्या स्वत:विषयीच्या सर्व कल्पना गळून पडल्या. अहंता, ममता, देहाभिमान, वैषयीक वासना इत्यादि गोष्टी मनात ठासून भरलेल्या असतील तर तेथे योगबुद्धीचा शिरकाव होऊ शकत नाही हे त्याच्या लक्षात आले. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. त्याप्रमाणे, स्वार्थी विचारांमुळे तात्पुरता फायदा बघणारी भोगबुद्धि आणि कायमचं कल्याण साधून देणारी योगबुद्धि कधीही एकत्र राहू शकत नाहीत. मायेच्या प्रभावाखाली असलेली भोगबुद्धि योगबुद्धीवर नेहमीच मात करते. हे लक्षात घेऊन त्याने सर्वसंग परित्याग केला आणि वनात जाऊन बाप्पांच्या उपदेशानुसार योगसाधना करून तो मुक्त झाला.
सर्वांनाच असा सर्वसंग परित्याग करून वनात जाऊन राहणं शक्य नाही कारण तसं करण्याची मानसिक तयारी लागते. ती असेल तरंच ते शक्य होतं. अन्यथा फजिती होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून प्रथम माणसाने निरपेक्षतेने कर्म करण्यास सुरुवात करावी. कर्म करून जे मिळेल त्यात समाधान मिळते व मानसिक शांती टिकून राहते. अशी मानसिक शांती सतत टिकून राहिली की, त्याची अहंता, देहाविषयीची ममता नाहीशी होऊन त्याच्या सर्व इच्छा संपल्याने तो नि:स्पृह होतो.
क्रमश:








