आरोग्याचं नाणं खणखणीत वाजायला हवे असेल तर मन आणि शरीर या दोन्ही बाजू ठणठणीत असाव्या लागतात. मन अस्वस्थ असेल तर शरीर स्वस्थ राहू शकत नाही. त्यासाठी उत्कृष्ठ मानसिक आरोग्य हीच चांगल्या जगण्यासाठीची गुरुकिल्ली आहे. काळ झपाट्याने बदलतो आहे. जग जवळ येत चाललंय आणि सर्वच क्षेत्रांत प्रचंड उलथापालथ सुरु आहे. जीवनशैली, कार्यसंस्कृती बदलते आहे. सुखसोयी वाढत आहेत. पण त्याचबरोबर स्पर्धा, अस्थिरता वाढते आहे. त्यामुळेच ताण-तणावही नकळतपणे वाढत आहे. नव्या तंत्रज्ञानाने जीवनात क्रांती घडवली आहे. पारंपारिक अनेक कल्पना-संकल्पना मोडीत निघत आहेत. माणूस मात्र आपले समाधान आज हरवून बसल्याचे दिसून येते.
यशस्वी आयुष्य जगण्यासाठी जिद्द हवी असते, धैर्य आणि आत्मविश्वास हवा असतो. हे सारे कुठे असतं? तर हे तुमच्या मनातच तर असतं. मनावर ताबा मिळवणं हे भल्याभल्यांना अशक्य असतं. म्हणूनच म्हणतात, जो मन जिंकतो तो जग जिंकतो. मजेत जगण्याला भिडायचं असेल तर विचार, कल्पना, भावना, सवयी आणि संकल्पना या सर्व बाबतीत ‘उत्कृष्ठ मानसिक आरोग्य’ जपणे अत्यंत गरजेचे आहे. सतत घड्याळांवर नजर, नुसती लगबग, कामावर जाण्याची धावपळ आणि रोजच्या जगण्यातील व्याप सांभाळताना लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अशा सर्वांची होणारी मानसिक ओढाताण हे आता रोजचेच चित्र झाले आहे. प्रत्येकक्षणी तणाव आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनलाय. लहान मुलेही आजकाल तणावग्रस्त दिसू लागली आहेत. प्रचंड स्पर्धा, गुणवत्तेचे ओझे आणि सतत टाइम टेबलप्रमाणे धावणे हे आजच्या विद्यार्थ्यांचे विश्व झाले आहे. भारतातील प्रत्येक पाच व्यक्तीपैकी एक जण मानसिक तणावाचा शिकार असल्याचे आकडेवारी सांगते आहे. देशाच्या कॉर्पोरेट जगतातील परिस्थिती आणखीनच गंभीर आहे. कॉर्पोरेट जगतात काम करणाऱ्या व्यक्ती दीर्घकाळ मानसिक तणावाखाली जगत असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. या क्षेत्रातील पन्नास टक्के लोक व्यसनाधीन आहेत तर 30 टक्के लोक खिन्नतेचे शिकार आहेत.
आजच्या जगात आरोग्याच्या समस्या, काम आणि वैयक्तिक आव्हाने यांचा ताण लक्षणीयरीत्या वाढला आहे. कठोर निर्णय घेण्यासाठी, व्यवस्थापन करण्यासाठी सकारात्मक मानसिक आरोग्य महत्त्वपूर्ण आहे. मानसिक आरोग्याचे महत्त्व समजून घेतल्याने आपल्याला मानसिक आजार टाळण्यास मदत होते आणि प्रोत्साहन मिळते. मानसिक आरोग्यामध्ये भावनिक, मानसिक आणि सामाजिक कल्याण समाविष्ट आहे. मानसिक आरोग्य हे आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर परिणाम करते, आपल्या कृती, विचार आणि परस्पर संवादांवर प्रभाव टाकते. तुम्हाला कसे वाटते, विचार करणे किंवा वागणे हे तुमच्या मानसिक आरोग्यावर अवलंबून असते. खरं तर, हे मुख्यत्वे तुम्ही तणावाचे व्यवस्थापन करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. दोन्ही मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार एकमेकांशी जोडलेले आहेत. बऱ्याचदा, मानसिक आजार असलेल्यांचे मानसिक आरोग्य बिघडलेले असते. योग्यरित्या व्यवस्थापित न केल्यास, यामुळे समस्या उद्भवू शकतात, डब्ल्यूएचओच्या मते, मानसिक विकारांमुळे भारतातील आत्महत्या दर 1,00,000 लोकांमागे 22 आहे हे खूप गंभीर आहे. लवकर मानसिक विकाराची लक्षणे तपासली गेली पाहिजेत आणि शक्य तितक्या लवकर त्याचे निराकरण करणे अत्यावश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, भारतातील 8.5 टक्के लोकसंख्या ही कोणत्या ना कोणत्या मानसिक समस्येची शिकार आहे. जगभरातील मानसिक आणि मज्जातंतू संबंधित आजारात भारताचा वाटा 15 टक्के आहे. अंदाजे जगभरातील एक अब्जाहून अधिक मानसिक आरोग्य विकारांनी त्रस्त आहेत. या मानसिक विकारांमध्ये चिंता आणि नैराश्यांसंबंधीचे प्रमाण एकूण रुग्णांमध्ये दोन तृतीयांशहून अधिक आहे. या मानसिक विकारांमुळे आर्थिक पातळीवर प्रचंड परिणाम होतो आहे. आत्महत्या ही तरुणांमधील मृत्यूचे एक प्रमुख कारण असून, जगभरातील तरुणांच्या आत्महत्येच्या वाढत्या संख्येने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ‘स्किझोफ्रेनिया’ आणि ‘मूड स्विंग’ ही जास्त मानसिक त्रास देणारी समस्या म्हणून जगासमोर आली आहे. प्रौढ व्यक्तींमध्ये याचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. ‘ग्लोबल हेल्थ एस्टीमेट्स’ आणि ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिज’ यांनी केलेल्या संशोधनात मानसिक विकार हाच सर्वात मोठा आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक विषय असल्याचे स्पष्ट झाले आहे. मानसिक विकारांवर जागतिक पातळीवर होणारे वार्षिक नुकसान अंदाजे एक ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत पोहचले आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
चांगले मानसिक आरोग्य उत्पादकता वाढवू शकते, स्वत:ची प्रतिमा सुधारू शकते आणि चांगल्या मानसिक आरोग्याचे फायदे म्हणजे मूड चांगला होतो. चिंता कमी होते. आंतरिक शांती वाढते, विचारांची स्पष्टता वाढते, परस्परसंवाद सुधारतो. आज भारतात 36 कोटी लोक मानसिक आजारांचा सामना करीत आहेत. मानसिक आरोग्याचा प्रभाव शैक्षणिक निकालांत, उत्पादन क्षमतेवर होतो. मनसोक्त, मनाजोगतं, मस्त आणि मजेत जगायचे असेल तर उत्कृष्ठ मानसिक आरोग्य हेच सर्वात महत्त्वाचे आहे.
प्रा. डॉ. गिरीश नाईक








