वृत्तसंस्था/ भोपाळ
‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट शुक्रवारपासून चित्रपटगृहांमध्ये झळकला. या चित्रपटाला केरळमधील काही राजकीय पक्षांनी आणि एका विशिष्ट समुदायाने चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी जोरदार विरोध केला होता. तसेच बंदीची मागणी केली होती. या वादामुळे चर्चेत आलेल्या या चित्रपटाला काही राज्यांनी करमुक्त केले आहे. मध्यप्रदेशमधील भाजप सरकारने हा चित्रपट करमुक्त केल्यानंतर अन्य राज्यांमध्येही चित्रपट करमुक्त करण्याची मागणी होत आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी सकाळी ट्विट करून याबाबतची घोषणा केली आहे. हा चित्रपट दहशतवादाचे भीषण सत्य समोर आणणारा असल्यामुळे राज्यात तो करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले. ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला सुरुवातीच्या टप्प्यातच चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून महाराष्ट्रातही करमुक्त करण्याची मागणी होत आहे









