शाहूपुरी पोलिसांनी 24 तासात लावला चोरीचा छडा, महिलेस ताब्यात घेऊन सोन्याचे दागिने व रोकड जप्त
प्रतिनिधी/ सातारा
येथील रामाचा गोट परिसरात वास्तव्य करणारे एक कुटुंबीय यात्रेनिमित्त बाहेरगावी गेले होते. घराची चावी शेजारी राहणाऱया संशयित महिलेकडे ठेवली होती. याचा फायदा घेत महिलेने घरातून अडीच तोळे सोन्यासह 16 हजार रुपये रोख चोरून नेले. या चोरीची तक्रार दाखल होताच त्या महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून अडीच तोळे सोन्यासह 16 हजार रुपये हस्तगत करण्यात शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले आहे. सायली प्रणव पवार (रा. गुरुज्योती अपार्टमेंट, रामाचा गोट, सातारा) असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 एप्रिल रोजी सातारा येथील रामाचा गोट परिसरात असणाऱया गुरुज्योती अपार्टमेंटमधील एक कुटुंबीय यात्रेनिमित्त घर बंद करून शेजारी राहणाऱया सायली पवारकडे चावी ठेवून गेले होते. यात्रेवरून परतल्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले अडीच तोळे सोन्याचे दागिने व 16 हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांनी या गुह्याचा छडा लावण्याच्या सूचना केल्या होत्या. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकासमवेत प्रशांत बधे या चोरीबाबत तपास करीत असताना त्यांना माहिती प्राप्त झाली, की यापूर्वी चोरीची तक्रार दाखल असलेली सायली पवार याच अपार्टमेंटमध्ये सध्या वास्तव्य करीत आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सायली पवारला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणत तिच्याकडे चौकशी केली. तिने प्रथम उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पथकाने कौशल्यपूर्वक तिच्याकडे विचारपूस केली असता तिने हा गुन्हा आपण केल्याची कबुली देत चोरलेले सोने सोनाराकडे गहाण ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी संबंधित सोनाराला ताब्यात घेऊन त्याच्याकडे गहाण ठेवलेले अडीच तोळे सोने व संबंधित महिलेकडून चोरलेले 16 हजार रुपये हस्तगत करून चोवीस तासाच्या आत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.








