कराड–सातारा मार्गावर तासन्तास वाहतुकीची कोंडी
उंब्रज : दिवाळी सुट्ट्यांचा समारोप होताच मुंबई–पुण्यासह विविध शहरांत कार्यरत असलेले चाकरमानी मोठ्या संख्येने परतीच्या प्रवासाला लागले आहेत. या परतीच्या लोंढ्यामुळे रविवारी आशियाई महामार्गावर वाहनांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. कराड ते सातारा या सुमारे ५० किलोमीटरच्या अंतरावर दिवसभर वाहतुकीचा ताण जाणवत होता.
रुंदीकरणाचे काम अपूर्ण असलेल्या ठिकाणी तसेच डायव्हर्जन देण्यात आलेल्या भागात वाहनांच्या रांगा लागल्या. काही ठिकाणी गाड्या तासन्तास अडकून राहिल्याने प्रवाशांचा त्रास वाढला. टोलनाक्यांवरही वाढलेल्या वाहनांमुळे प्रचंड दबाव निर्माण झाला होता. शनिवारी दिवसभर व रविवारी सकाळपासूनच कोल्हापूरकडून पुणे–मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. त्यामुळे हायवेवर कोंडीची स्थिती निर्माण झाली. अनेकांना प्रवासासाठी दुप्पट वेळ खर्च करावा लागला.
सणासुदीच्या काळात आशियाई महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर ताण येणे हे नवे नाही. मात्र, यंदा वाढलेल्या वाहनसंख्येमुळे व रुंदीकरणाच्या अपूर्ण कामांमुळे परिस्थिती अधिक बिकट बनली आहे. प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाने पुढील काही दिवस तरी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.








