भारताचा एक डाव 132 धावांनी विजय, अष्टपैलू जडेजा सामनावीर, अश्विनचे सामन्यात 8 बळी
वृत्तसंस्था/ नागपूर
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमधील आपला ऐतिहासिक विजय बलाढय़ ऑस्ट्रेलियावर मिळवला. भारताच्या फिरकी माऱयासमोर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 91 धावांत उखडला. उपाहारानंतरच्या दोन तासांच्या कालावधीत भारतीय फिरकी गोलंदाजांची कमाल शौकिनांना सुखद वाटली. भारताने चहापानापूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या दुसऱया डावात खुर्दा करत मालिकेत विजयी सलामी दिली. अष्टपैलू कामगिरी करणाऱया रविंद्र जडेजाला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. रविचंद्रन अश्विनने दुसऱया डावात 5 तर सामन्यात एकूण 8 बळी मिळवले. ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण करणाऱया टॉड मर्फीने सात बळी मिळवले पण त्याची कामगिरी वाया गेली.

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना भारतीय फिरकीला तोंड देणे खूपच कठीण गेले. अश्विनच्या तसेच जडेजा आणि अक्षर पटेल यांच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज शेवटपर्यंत चाचपडत असल्याचे दृष्य पाहावयास मिळाले. नागपूरच्या टर्निंग खेळपट्टीवर आक्रमक किंवा बचावात्मक फलंदाजी करणे योग्य ठरेल, या संभ्रंम अवस्थेमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाज शेवटपर्यंत राहिले. याचा फायदा भारतीय गोलंदाजांनी पुरेपूर घेत आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला.

या कसोटीमध्ये दोन्ही संघांचे फिरकी गोलंदाज प्रभावी ठरल्याचे दिसून आले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात रविंद्र जडेजाने 5 गडी तर अश्विनने 3 गडी बाद केले होते. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 177 धावांत रोखल्यानंतर भारताने पहिल्या डावात समाधानकारक फलंदाजी करताना 400 धावांचा डोंगर उभा केला. याचे श्रेय प्रामुख्याने कर्णधार आणि शतकवीर रोहित शर्मा तसेच अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना द्यावे लागेल. जडेजा आणि अक्षर पटेल यांनी शानदार शतके झळकवली.
भारताने 7 बाद 321 या धावसंख्येवरून शनिवारी खेळाच्या तिसऱया दिवसाला पुढे प्रारंभ केला. जडेजा आणि अक्षर पटेल या जोडीने आठव्या गडय़ासाठी 88 धावांची भागीदारी केली. जडेजा आपल्या 66 या धावसंख्येत केवळ 4 धावांची भर घालू शकला. मर्फीच्या खूपच वळलेल्या चेंडूवर स्वीपचा फटका मारण्याच्या नादात जडेजाचा त्रिफळा उडवला. त्याने 185 चेंडूत 9 चौकारांसह 70 धावा झळकवल्या. जडेजा बाद झाल्यानंतर अक्षर पटेलला साथ देण्यासाठी मोहमद शमीचे मैदानात आगमन झाले. शमीने ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजीसमोर आक्रमक फटकेबाजी केली. त्याने 47 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारासह 37 धावा जमवताना अक्षर पटेलसमवेत नवव्या गडय़ासाठी 52 धावांची भागीदारी केली. मर्फीच्या गोलंदाजीवर शमी कॅरेकरवी झेलबाद झाला. अक्षर पटेल एका बाजूने सावध फलंदाजी करत होता. दरम्यान कमिन्सच्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला. पटेलने 174 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारासह 84 धावा झळकवल्या. भारताचा पहिला डाव उपाहारावेळी 139.3 षटकात 400 समाप्त झाला. भारताने ऑस्ट्रेलियावर पहिल्या डावात 223 धावांची भक्कम आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियातर्फे टॉड मर्फीने 124 धावात 7 तर कमिन्सने 78 धावात 2 आणि लियॉनने एक गडी बाद केला.

ऑस्ट्रेलयाची हाराकिरी
नागपूरची खेळपट्टी शनिवारी खेळाच्या तिसऱया दिवशी फिरकीला अधिकच अनकुल असल्याचे दिसून येत असतानाही ऑस्ट्रेलियन फलंदाज बचावात्मक किंवा आक्रमक फलंदाजी करण्याच्या गोंधळामध्ये दिसत होते. चेंडू खूपच खाली रहात असल्याने कर्णधार शर्माने सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर क्षेत्ररक्षणाचे कडे ठेवले होते. नव्या चेंडूवरच अश्विनने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चांगलेच नाचवले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱया डावाला दुसऱया षटकापासूनच गळती लागली. अश्विनच्या या षटकातील चेंडूवर सलामीचा उस्मान ख्वाजा कोहलीकरवी झेलबाद झाला. त्याने 5 धावा जमवल्या. लाबुशेन आणि वॉर्नर ही जोडी संघाला सावरेल असे वाटत होते पण जडेजाने लाबुशेनला पायचित केले. त्याने 3 चौकारासह 17 धावा केल्या. यानंतर अश्विनने ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का देताना सलामीच्या वॉर्नरला पायचित केले. त्याने 2 चौकारासह 10 धावा केल्या. मॅट रेनशॉ, हँडस्कॉम्ब, कॅरे यांनी केवळ मैदानात हजेरी लावली. अश्विनने रेनशॉला 2 धावावर तर त्यानंतर हँडस्कॉम्बला 6 धावावर पायचित केले. ऑस्ट्रेलियाची स्थिती यावेळी 17.2 षटकात 5 बाद 52 अशी केविलवाणी होती. मात्र, अनुभवी आणि सध्या बऱयापैकी फॉर्ममध्ये असलेला स्टीव्ह स्मिथ एका बाजूने संघाचा पराभव लांबवण्यासाठी प्रयत्न करीत होता. जडेजाने कर्णधार कमिन्सला यष्टीरक्षक भरतकरवी झेलबाद केले. त्यानंतर अक्षर पटेलने टॉड मर्फीला शर्माकडे झेल देण्यास भाग पाडले. शमीने नाथन लेयॉनचा 8 धावावर त्रिफळा उडवला. तर शमीने बोलँडला खाते उघडण्यापूर्वीच पायचित करून ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 32.3 षटकात 91 धावावर संपुष्टात आणला. स्टीव्ह स्मिथने एकाकी लढत देत 51 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 25 धावा जमवल्या. अश्विनने 37 धावात 5, जडेजाने 34 धावात 2, अक्षर पटेलने 6 धावात 1 तर शमीने 13 धावात 2 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱया डावात 6 फलंदाज पायचित झाले. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अश्विनच्या गोलंदाजीवर हाफ फॉरवर्ड येऊन खेळण्याच्या प्रयत्नात आपल्या विकेट्स गमवल्या.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया प.डाव 63.3 षटकांत सर्व बाद 177. भारत प. डाव 139.3 षटकांत सर्व बाद 400 ः रोहित शर्मा 120 (21 चेंडूत 15 चौकार, 2 षटकार), केएल राहुल 20 (71 चेंडूत 1 चौकार), अश्विन 23 (62 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), पुजारा 7, कोहली 12, सूर्यकुमार 8, जडेजा 70 (185 चेंडूत 9 चौकार), श्रीकर भरत 8, अक्षर पटेल 84 (174 चेंडू, 1 षटकार, 10 चौकार), मोहमद शमी 37 (47 चेंडू, 3 षटकार, 2 चौकार), मोहमद सिराज नाबाद 1, अवांतर 10. गोलंदाजी ः कमिन्स 2-78, लियॉन 1-126, मर्फी 7-124, बोलँड 0-34, लाबुशेन 0-24, रेनशॉ 0-7), ऑस्ट्रेलिया दु. डाव 32.3 षटकात सर्व बाद 91 ः उस्मान ख्वाजा 5 (9 चेंडू, 1 चौकार), वॉर्नर 10 (41 चेंडू, 2 चौकार), लाबुशेन 17 (28 चेंडू, 3 चौकार), स्टिव्ह स्मिथ नाबाद 25 (51 चेंडू, 1 षटकार, 2 चौकार), रेनशॉ 2 (7 चेंडू), हँडस्कॉम्ब 6 (6 चेंडू, 1 चौकार), कॅरे 10 (6 चेंडू 2 चौकार), कमिन्स 1 (13 चेंडू), मर्फी 2 (15 चेंडू), लेयॉन 8 (20 चेंडू, 2 चौकार), बोलँड 0 (चेंडू), गोलंदाजी ः शमी 2-13, रविचंद्रन अश्विन 5-37, जडेजा 2-34, अक्षर पटेल 1-6).









