ज्यावेळी पाहुणे संघ भारतात येतात त्यावेळी ते आनंदी असतात आणि थोडेसे दु:खी पण असतात. आनंदी अशा अर्थाने 80 टक्के खेळपट्टी पाटा असणार, आणि अशा खेळपट्टीवर फलंदाजीचा मन:पूर्वक आनंद घ्यायचा. दु:खी अशा अर्थाने चेंडू वळायला लागले की फक्त ब्रेक डान्सशिवाय पर्याय नाही. कांगारूचा संघ ज्या ज्या वेळी भारतात आलाय त्या त्या वेळी भारतीय फिरकीने त्यांना चांगलंच नाचवलंय. आठवतंय ना, 2001 चा ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा. या दौऱ्यात मुंबईत बऱ्याच ठिकाणी हरभजनचे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. त्या होर्डिंग्जवर लिहिले होते, हर ऑस्ट्रेलियन को भजन सिखाने के लिए आये है हमारे हरभजन. कांगारूंना त्या काळात अशा अपमानाची सवय नव्हती हो. परंतु त्यानंतर भारतात स्पिनर्सना कसे खेळावे हे विदेशी संघांना ऑसीने दाखवून दिले.
या सर्व गोष्टीचा ऊहापोह करण्याचे कारण म्हणजे पहिल्या दोन सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने घेतलेली उसळी मला धोकादायक वाटू लागली आहे. त्यातच काल परवाचा विराट विजय बघून माझ्या मनात थोडीशी धडकी भरली. भलेही तो नवख्या नेदरलँड्सविरुद्धचा का असेना. शेवटी विजय हा विजय असतो क्रिकेटमध्ये आक्रमकता हा जर शब्द कुठून आला असेल तर तो ऑस्ट्रेलियातूनच. अर्थात सर डॉन ब्रॅडमन यांच्याकडून. इंग्लंडच्या जन्मदात्याने बॉडीलाईनसारखं अमोघ शस्त्र लारवूडच्या हातात देण्याचा प्रयत्न केला खरा, पण तोही फसला (लारवूडबद्दल नंतर कधीतरी बोलू). कसोटीत 99.99 ची सरासरी असलेली व्यक्ती, त्यावरुन आपण अंदाज बांधू शकता की त्यांच्या फलंदाजीत आक्रमकता किती ठासून भरलेली असावी याचं हे ज्वलंत उदाहरणच. ऑसीचा संघ आता
बऱ्यापैकी कात टाकताना दिसतोय.
तीन-चार दिवसांपूर्वी ज्या पद्धतीने कांगारूच्या फलंदाजांनी खेळ केला, विशेषत: डेव्हिड वॉर्नर आणि मॅक्सवेल यांच्यामध्ये चेंडू भिरकवण्याची जी स्पर्धा लागली होती ते पाहून ऑस्ट्रेलियन संघ निश्चितच सुखावला असेल. मी मागच्या लेखात म्हटलो होतो की वॉर्नर शांत आहे तोपर्यंत ठीक, पण एकदा का तो पाच-सहा षटकं खेळला की तो थैमान घालणारच. तीच गोष्ट मॅक्सवेलची. मॅक्सवेल हा भारताचा जावई आहे. आणि जावई म्हटलं की सासुरवाडीला खुश करणं आलंच, काल-परवा खऱ्या अर्थाने त्याने सासुरवाडीला खुश केलं. दुसऱ्या बाजूने झॅम्पा कर्दनकाळ ठरू पाहतोय. झॅम्पा म्हटलं की मला अनिल कुंबळे आठवतो. कधी कधी मी अनिल कुंबळेला अनिल सरळ कुंबळे म्हणतो. कारण त्याच्या या सरळ चेंडूनेच त्याला कीर्तिमान बनवलं. तीच गोष्ट झॅम्पाची. त्याचे लेगब्रेक कमी पण फ्लिपरवर त्याचा जास्त भर. आणि कधीकधी क्रिकेटच्या भाषेत राँगवन टाकत भल्याभल्यांची भंबेरी उडवतो. ज्या पद्धतीने कांगारूची फलंदाजी आणि गोलंदाजी बघायला मिळाली त्यावरून मी क्षणभर हायलाइट्स बघत आहे की काय, असा भास निर्माण झाला. एखाद्या गोलंदाजांचा खिमा करणे म्हणजे काय, याचे उत्तर दोन-तीन दिवसापूर्वी मला मिळालं. ज्यावेळी शाहिद आफ्रिदीने झटपट क्रिकेटमध्ये जलद शतक झळकवलं होतं, त्यावेळी मी खऱ्या अर्थाने त्या शतकाच्या प्रेमात पडलो होतो. पुन्हा एकदा मॅक्सवेलने ते प्रेम जागृत केलं. मॅरेथॉन स्पर्धेत काही खेळाडू संथ सुरुवात करतात आणि स्पर्धेच्या मध्यंतरीस वेग पकडत समोरच्या स्पर्धकाला मागे टाकत आगेकूच करण्याचा प्रयत्न करतात. नेमका हाच प्रयत्न कांगारु सध्या करत आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात ते येणारा काळच ठरवणार आहे.
असो. कांगारुचा संघ वाघासारखा दोन पावले मागे जात उर्वरित सामन्यातील प्रतिस्पर्ध्यांची शिकार करतो की नाही हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यातच इंग्लंडचा संघ जवळपास स्पर्धेच्या बाहेर गेलाय हे त्यांच्या पथ्यावर निश्चितच पडणार आहे. त्यातच जर आफ्रिकेने पाकिस्तानला पराभूत केलं तर त्यांच्यासाठी सोने पे सुहागा. स्पर्धेतील आपले दोन पराभव हे फ्लूक होते हे ऑस्ट्रेलियन संघ कदाचित ठणकावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सरते शेवटी मला ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर उदय निरगुडकर यांचे एक वाक्य आठवलं. ते नेहमी म्हणतात, तुम्ही निराशावादी न होता प्रयत्नवादी बना, नेमक्या याच प्रयत्नवादाची शिडी सर करून कांगारुचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला तर नवल वाटायला नको. शेवटी हा क्रिकेटचा खेळ आहे. त्यातच ही विश्वचषक क्रिकेट स्पर्धा. त्यामुळे आता होणारा प्रत्येक सामना हा सुपरफोर साठीच असणार यात काही शंका नाही.
-विजय बागायतकर









