सातारा :
सातारा शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या कास पुष्प पठारावर लफड्याच्या कारणावरून एकास सहा जणांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला. जखमी झालेल्या युवकास सातारा शहरातील प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, या घटनेची नोंद पोलीस दप्तरी दोन्ही बाजूकडून मंगळवारी रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती. जखमी झालेल्या युवकाचे नातेवाईक हॉस्पिटलबाहेर दिवसभर तळ ठोकून होते. या प्रकरणाची सातारा शहरात खमंग चर्चा सुरू होती.
जागतिक वारसास्थळ असलेले कास पुष्प पठार अलीकडे प्रेमप्रकरणे व गैरकृत्याच्या घटनांमुळे चर्चेत येत आहे. अंधारी येथील मृतदेह प्रकरण चांगले गाजले. त्या अगोदर डिसेंबर महिन्यात हॉटेलमध्ये रंगलेली डान्स पार्टी जगजाहीर झाली. असे असतानाच प्रेमाच्या महिन्यात अगदी व्हॅलेंटाईन डे च्या चार दिवस अगोदरच कास पठारावर लफड्यातून हाणामारी झाली आहे. तीही एका महिलेसोबत युवक आढळून आला म्हणून सहा जणांनी मारहाण केली आहे. सातारा शहरातील एका भागात राहणाऱ्या युवकाचे आणि एका महिलेबरोबर ओळख झाली. त्याच महिलेसोबत आर्थिक व्यवहारही झाले. त्यातूनच पैसे परत करण्यासाठी सततचा तगादा सुरू झाला. मात्र, तो युवक आणि ती महिला सोमवारी रात्री कास परिसरात एकमेकांना वेगळ्या अर्थाने भेटण्यासाठी गेले. तिथे हे दोघे गेल्याची माहिती त्या महिलेच्या जवळच्याना समजताच तेही तिथं पोहोचले. त्यांनी त्या दोघांना बघताच आधी शाब्दिक वाद सुरू झाला. नंतर त्या सहा जणांनी त्याला मारहाण केली आणि संबंधित महिलेसह सात जण तेथून निघून आले. त्या जखमी झालेल्या युवकाने फोनवरून कुटूंबातील इतरांना माहिती दिली. त्यांनी त्यास जखमी अवस्थेत सातारा येथे उपचारासाठी आणले असून एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, दिवसभर त्या जखमी युवकाचे नातेवाईक हॉस्पिटलबाहेर उभे होते. तर दोन्ही बाजूकडून पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.
- व्हॅलेंटाईन डे च्या अगोदरच लफडं उघड
अलीकडे व्हॅलेंटाइन डे चं फॅड वाढले आहे. त्या आठवड्यातला प्रपोज डे झाला, आणखी कुठला डे झाला मात्र याच डे च्या निमित्ताने कास पठारावर भेटण्यासाठी गेलेल्या या लफड्याची हाणामारीमुळे जोरदार चर्चा आहे. दरम्यान, दोन्ही बाजूकडून आपलीच इज्जत जाईल या भीतीपोटी तक्रार दाखल केली जात नाही अशीही चर्चा आहे. त्यामुळे कासचं लफडं, परस्पर दडपण्याचाच प्रकार होवू लागला आहे.








