युक्रेनमध्ये लोकांनी साजरा केला ईस्टर ः युद्ध संपावे अशी प्रार्थना
युक्रेनमध्ये चहुबाजूला विध्वंसच दिसून येतोय. युक्रेनमधील शहरांवर रशियाचे हल्ले सातत्याने सुरू आहेत. दोन्ही देशांच्या सैन्याला या युद्धात मोठे नुकसान झाले आहे. परंतु युद्धाचा सर्वाधिक प्रभाव सर्वसामान्य नागरिकांवर पडला आहे. लोक बंकरमधून लपून स्वतःचा जीव वाचवत आहेत. परंतु भीतीच्या छायेदरम्यान त्यांच्या मनात स्थिती सामान्य होण्याची अपेक्षा आहे. याच अपेक्षेसह लोकांनी रविवारी युक्रेनमध्ये ऑर्थोडॉक्स ईस्टर साजरा केला आहे.
पुढील 5 दिवस युक्रेनमध्ये पूर्ण प्रथा-परंपरेसह ईस्टर पर्व साजरा केला जाणार आहे. ईस्टर निर्धास्त होत आनंद साजरा करण्याचा सण आहे, परंतु युक्रेनमधील स्थिती अत्यंत बिकट आहे. येथील लोकांच्या डोळय़ांमधून वाहणारे अश्रू थांबण्याची चिन्हे नाहीत. युद्धामुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. कित्येकांनी स्वतःच्या स्वकीयांना गमाविले आहे. आता युद्ध शमण्याची आणि नव्याने जीवन सुरू करण्याची प्रतीक्षा लोकांना लागून राहिली आहे. ईस्टर पर्वाच्या प्रथा-परंपरेनुसार लोक एक बास्केट घेऊन चर्चला जातात. या बास्केटला कापडाने झाकण्यात येते आणि मग त्यात ईस्टर ब्रेड, बटर, चीज समवेत खाद्यसामग्री ठेवण्यात येते. खाद्यपदार्थ असलेल्या बास्केटसह पोहोचलेल्या लोकांना चर्चचे पाद्री आशीर्वाद देतात. ज्यानंतर लोक ईस्टर ब्रेकफास्टमध्ये या पदार्थांचे सेवन करतात.









