सतत पंधरा दिवस धुमाकूळ, रहिवाशांमध्ये दहशत, पोलिसांनाही गुंगारा, संयुक्तरित्या गस्त घालण्याचा निर्णय, सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोराची छबी कैद
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरवासियांना उपद्रव करणारा गुन्हेगार अद्याप मोकाटच आहे. त्याला पकडण्यासाठी बेळगाव शहरातील संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली तरी पोलिसांना गुंगारा देत तो खुलेआम एकामागून एक गुन्हे करतो आहे. खास करून शहापूर, वडगाव, अनगोळ परिसरातील घरांना लक्ष्य बनविणारा तो गुन्हेगार कधी पोलिसांच्या जाळ्यात अडकणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या पुढाकारातून त्या एकाकी गुन्हेगाराला अटक करण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. रात्रीच्या गस्तीवर अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे. ज्या भागात गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने गुन्हे सुरू आहेत, त्या भागात पोलिसांबरोबरच स्थानिक नागरिकही मैदानात उतरले आहेत. आनंदनगर, वडगाव परिसरातील नागरिकांनी तर बैठक घेऊन चोऱ्या थोपविण्यासाठी काय करावे? यासंबंधी चर्चा केली आहे. परिसरातील तरुणही हातात लाठ्या-काठ्या घेऊन रात्रीची गस्त घालू लागले आहेत. यापूर्वीही बेळगावात अनेकवेळा नागरिकांनी गस्त घातल्याची उदाहरणे आहेत. पोलीस आयुक्त कार्यालय सुरू झाल्यानंतर केवळ एक-दीड वर्षात इराणी टोळीतील गुन्हेगारांबरोबरच अनेक आंतरराज्य गुन्हेगारी टोळ्यांच्या बेळगावात कारवाया वाढल्या होत्या. त्यावेळी नागरिकांनी खास करून महिलांनी हातात काठ्या घेऊन गस्त घातली होती.
गुन्हेगार तळ ठोकून असल्याचा संशय
आता उपनगरातील नागरिकांना भयभीत करणाऱ्या एका गुन्हेगाराला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या आठवड्यात तर शहापूर, वडगाव, अनगोळ परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली होती. ही यंत्रणा एका बाजूला गस्त घालत होती तर त्याच परिसरातील दुसऱ्या भागात घरफोडीचा प्रयत्न झाला. यावरून गुन्हेगार अद्याप बेळगावात तळ ठोकून असल्याचा संशय आहे. पोलीस यंत्रणा त्याचीही खातरजमा करीत आहेत. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तर स्थानिक नागरिकांची भेट घेऊन वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी काय करावे? काय करू नये? यासंबंधी मार्गदर्शन केले आहे. प्रमुख ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले आहेत. अनोळखी व संशयास्पद व्यक्ती फिरताना आढळून आल्यास जवळच्या पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करीत पोलीस अधिकारी व पोलीस स्थानकाचे फोन क्रमांक भित्तीपत्रात नोंदविण्यात आले आहेत.
सध्या ज्या परिसरात चोऱ्या, घरफोड्या सुरू आहेत, त्या परिसरात पोलीस वाहनातून ध्वनीक्षेपकावरून जागृती करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याबरोबरच वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकांचे वाटप करण्यात आले आहे. परगावी जाताना तुमच्या घरातील दागिने, रोकड व इतर किमती वस्तू लॉकरमध्ये ठेवा. किमती वस्तूंची काळजी घ्या. घरांबरोबरच मंदिरातील दागिनेही सांभाळा, असा सल्ला पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे. घराला कुलूप लावून परगावी जाताना शेजाऱ्यांना किंवा जवळच्या पोलीस स्थानकाला माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सतत सुरू असलेल्या चोऱ्या, घरफोड्यांच्या सत्रामुळे स्थानिक नागरिक जागरुक झाले आहेत. उपनगरातील घरांना लक्ष्य बनविणाऱ्या त्या गुन्हेगाराच्या शोधासाठी पोलीस दलाला पूर्णपणे सहकार्य करीत असले तरी याकामी तपास अधिकाऱ्यांना यश आले नाही. उपलब्ध माहितीनुसार गेल्या आठवड्यात संशयित गुन्हेगार अनेकवेळा पोलीस आणि नागरिकांच्या हाताला लागला होता. मात्र, साऱ्यांनाच चकमा देत पलायन करण्यात प्रत्येक वेळी तो यशस्वी ठरतो आहे. सुरुवातीला एका दुचाकीवरून गुन्हेगार फिरत होता. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याची छबी कैद झाली आहे. त्या फुटेजवरून गुन्हेगाराचा शोध घेण्यात येत आहे. उपनगरात उच्छाद मांडणारा गुन्हेगार कोण? याचे धागेदोरे तपास अधिकाऱ्यांना मिळाले आहेत. सध्या त्याचा माग काढण्याचे काम सुरू आहे. सतत ठिकाण बदलण्याच्या त्याच्या प्रवृत्तीमुळे तपास यंत्रणेला त्याचा शोध घेणे अवघड जात आहे.
पंधरा दिवसात पंधराहून अधिक घरफोड्या
एखाद्या चोरीच्या घटनेनंतर गुन्हेगार त्या दागिन्यांची विक्री करतात. त्यामुळे चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्यांवरही पोलिसांनी बारकाईने नजर ठेवली आहे. केवळ बेळगावच नव्हे तर शेजारच्या जिल्ह्यातही संबंधित गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केवळ पंधरा दिवसात पंधराहून अधिक घरफोड्या करून लाखोंचा ऐवज पळविणाऱ्या गुन्हेगाराचा शोध घेण्यात येत आहे. बेळगाव पोलिसांनी यासाठी कंबर कसली आहे. जर प्रयत्नांना यश आले तर एक खतरनाक आंतरराज्य गुन्हेगार बेळगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकणार आहे.
नागरिकच सरसावले
शहापूर, वडगाव परिसरातील नागरिक या गुन्हेगाराच्या कारवायांनी पुरते हैराण झाले आहेत. केवळ पोलीस यंत्रणेकडून त्याच्या मुसक्या आवळणे शक्य होईना हे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी स्वत:च काठी हाती घेतली आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता एकाच परिसरात सतत चोऱ्या करणाऱ्या गुन्हेगाराने पोलिसांना चकविण्यासाठी बेळगाव परिसरातच वास्तव्यासाठी एखादे घरही घेतले असावे, असा संशय आहे. जर तो गुन्हेगार नागरिकांच्या तावडीत सापडला तर त्याला अद्दल घडविण्याची मन:स्थिती तयार झाली आहे.









