अध्याय पाचवा
आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची बुद्धी होणे हा जीवनातील सगळ्यात चांगला योग आहे हे बाप्पांनी गणेशगीतेच्या सुरवातीलाच सांगितलं आहे. तो योग कसा साधायचा ह्यादृष्टीने सुसंगत असा उपदेश वरेण्या राजाला आत्तापर्यंत बाप्पांनी केलेला आहे. कुठलीही गोष्ट करायची झाली की, ती मनापासून केली तरच यशस्वी होते. त्यासाठी मनात त्या गोष्टीचे महत्त्व ठसावे लागते. म्हणजे मग मन निष्ठापूर्वक ती गोष्ट करण्याचा ते प्रयत्न करते हा अनुभव सर्वांनाच येत असतो. निष्ठापूर्वक एखादी गोष्ट मनुष्य करू लागला की, ह्यामुळे आपले कायमचे भले होणार आहे अशी त्याला खात्री वाटत असते. ह्या खात्रीमुळे त्याचे मन त्या ठिकाणी स्थिर होते. मनुष्याचे मन योगाच्या म्हणजे, जीवनातील सगळ्यात चांगल्या योगाच्या ठिकाणी स्थिर व्हावे अशी बाप्पांची इच्छा आहे. मन ज्या ठिकाणी स्थिर होते त्याबद्दलचे विचार माणसाच्या मनात येत असतात. मनात येणाऱ्या विचारांवर त्याचे चित्त चिंतन करत असते आणि त्या चिंतनानुसार माणसाच्या हातून वर्तन घडत असते. म्हणून ह्या अध्यायात बाप्पा अशा वर्तनाची प्रशंसा करत आहेत.
चौथ्या अध्यायाच्या शेवटी बाप्पांनी सांगितलं होतं की कर्ममार्ग आणि संन्यासमार्ग या दोन्हीपैकी कुठल्याही मार्गाचे निष्ठापूर्वक आचरण करणाऱ्या योग्यांना सारखीच फळे मिळतात. ज्ञानेश्वरीच्या पाचव्या अध्यायात माऊली असं म्हणतात की, कर्ममार्ग आणि संन्यासमार्ग ही एकाच रस्त्याचे दोन भाग आहेत. रस्त्याच्या कर्ममार्गाचा भाग पूर्णतया चालून संपवला की, साधक त्याच रस्त्याच्या पुढील भागातून म्हणजे संन्यासमार्गावरून पुढे चालू लागतो. ह्या मार्गाचा शेवट मोक्षप्राप्तीत होतो. मोक्षावस्थेत आत्म्याचे परमात्म्याशी मिलन हे ठेवलेलेच असते. हे सगळे कसे घडते ते पाहू. कर्मयोगी निरपेक्षतेनं कर्म करत असला तरी कर्म केले की ते करणाऱ्याची इच्छा असो वा नसो फळ हे मिळतेच. हे मिळालेले फळ हे नाशवंत म्हणजे कधी ना कधी नष्ट होणारे आहे हे कर्मयोग्याच्या लक्षात आले की, त्याला त्यातली निरर्थकता समजते कारण त्याला कायम टिकणाऱ्या वस्तूची म्हणजे ईश्वरभेटीची आस लागलेली असते. असे झाले की, तो मिळालेल्या फळाचा राजीखुशीने त्याग करायला तयार होतो. त्यामुळे येथून पुढे त्याची संन्यास मार्गावरून मोक्षाच्या दिशेने पुढे वाटचाल सुरु होते. थोडक्यात ज्याला आत्म्याचे परमात्म्याशी मिलन हा उतम योग साधण्याची इच्छा आहे. त्याने कर्मयोगाच्या आचरणापासून सुरवात करावी. म्हणजे आपोआपच त्याचे कर्म करून फलत्याग करणाऱ्या संन्याशात रुपांतर होते. पाचव्या अध्यायाची सुरवात करताना बाप्पा सांगतात की, कर्मयोग आचरणारा संन्यास मार्गाचे आचरण करणाऱ्यापेक्षा प्रशंसनीय आहे.
श्रीगजानन उवाच -श्रौतस्मार्तानि कर्माणि फलं नेच्छन्समाचरेत् ।
शस्तऽ स योगी राजेन्द्र अक्रियाद्योगमाश्रितात् ।। 1 ।।
अर्थ- श्रीगजानन म्हणाले, फलाची इच्छा न धरता मनुष्याने श्रौत व स्मार्त कर्मांचे आचरण करावे. हे राजेंद्रा, योगाचा आश्रय केलेल्या पण कर्मरहित असलेल्या योग्यापेक्षा फळाची इच्छा न धरता कर्म करणारा प्रशंसनीय होय.
विवरण- प्रथम श्रौत आणि स्मार्त कर्मे म्हणजे काय ते समजून घेऊ. श्रुतींनी म्हणजे वेदांनी सांगितलेल्या कर्माना श्रौत म्हणतात तर स्मृतींनी सांगितलेल्या धर्मकार्याला स्मार्त म्हणतात. बाप्पा सांगतात श्रौत व स्मार्त ही दोन्ही प्रकारची कर्मे माणसाने फळाची इच्छा न धरता करावीत. बाप्पांच्या सांगण्याप्रमाणे जो साधक निरपेक्षतेने कर्मे करण्यास सुरवात करेल त्याची मोक्षाच्या दिशेने वाटचालीला सुरवात होते.
क्रमश:








