कोल्हापूर/विनोद सावंत
धावत्या बसला इंजिनमध्ये आग, ब्रेकडाऊन अशा वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे केएमटीचा प्रवास जीव मुठीत घेऊनच करावा लागत आहे. बस फुल्ल झाल्याने प्रवेशद्वारातच प्रवासी लोंबकळत जात आहेत. ‘निकृष्ट दर्जाच्या खरेदी केलेल्या बस आणि अपुऱ्या ‘बस’मुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
केएमटीच्या 39 बस स्क्रॅप झाल्या. केवळ 61 बसवर शहर आणि लगतच्या गावांतील सुमारे 40 हजारांहून अधिक प्रवाशांचा डोलारा आहे. अपुऱ्या बसमुळे दहाहून अधिक मार्गावरील फेऱ्या बंद आहेत. काही मार्गावरील फेऱ्यांची संख्या कमी केली आहे. त्यामुळे मार्गस्थ बस प्रवाशांनी भरलेल्या असतात. सकाळी, सायंकाळी विद्यार्थी, नोकरदारांची बसमध्ये गर्दी होत आहे. पुन्हा लवकर बस नसल्याने काही प्रवासी प्रवेशद्वाराजवळ लोंबकळत उभे असतात. 54 प्रवाशी क्षमतेच्या बसमध्ये 100 जण प्रवास करत आहेत. परिणामी लहान मुले, महिला-ज्येष्ठांना बसण्यासाठी सोडा उभारण्यासाठीही जागा मिळत नाही. बस प्रवाशांनी फुल्ल असल्याने श्वास घेणेही कठीण होऊन जात आहे.
सद्यस्थितीत 15 दिवसांतून एकदा बसचा ब्रेकफेल, इंजिनमध्ये आग अशा घटना घडत आहेत. रविवारी निगवे आंबा स्टॉप येथे तर गिअर बॉक्सजवळच आग लागल्याने चालकाने बसमधूनच बाहेर उडी मारल्याची चर्चा आहे. बसमधील 10 ते 15 प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. सुदैवाने रस्त्याकडेला चरीत बस अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर केएमटीचा प्रवास धोकादायक बनला आहे.
चांगल्या बस स्क्रॅप, खुळखुळा झालेल्या बस सवेत
स्क्रॅप झालेल्या 39 बस जुन्या लाल-पिवळ्या टाटा कंपनीच्या आहेत. वास्तविक त्याची आसन क्षमता जास्त आणि नादुरूस्त होत्या. त्या स्क्रॅप झाल्या आणि नव्याने निकृष्ट बस सेवेत आहेत. या बसचा अक्षरश: खुळखुळा झाला असून रोज चार-पाच बस ब्रेकडाऊन होतात. चार महिन्यांत झालेल्या अपघातामध्ये सर्वाधिक बसेस याच आहेत.
केएमटीच्या उद्देशालाच हारताळ
‘किफायतशीर भाड्यात वक्तशीर आणि विश्वासार्ह प्रवास’ देणे या उद्देशाने तत्कालीन नगराध्यक्ष श्रीपतराव बोंद्रे यांनी केएमटीची स्थापना केली. परंतु वारंवार अपघात आणि जीव मुठीत घेऊन करावा लागणाऱ्या प्रवासामुळे त्यांच्या उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम होत आहे.
आणखीन 15 बस जानेवारीत स्क्रॅप होणार
केएमटीकडे बसची संख्या कमी आहे. त्यामुळे फेऱ्या कमी केल्याने क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत आहेत. सध्या 9 ए.सी. बस मिळाल्या आहेत. परंतु जानेवारीमध्ये 15 जुन्या बस स्व्रॅप होणार आहेत. यामध्ये 9 बस वापरातील आहेत. एक मोबाईल टॉयलेटसाठी वापरली जात आहे. त्यामुळे पुन्हा 61 बसच मार्गस्थ होणार असून केएमटीच्या स्थितीमध्ये फारसा बदल होणार नाही.
पीएम ई बसला लागणार अवधी
पीएम ई बस योजनेत देशातील 100 शहरात 10 हजार इलेक्ट्रीक बस दिल्या जाणार आहेत. यामध्ये कोल्हापूरच्या समावेशासाठी राजकीय ताकद पणाला लावावी लागणार आहे. जरी बस मिळाल्या तरी केएमटीच्या ताफ्यात येण्यासाठी दीड दोन वर्ष लागणार आहेत.
स्वनिधीतून बस खरेदीचा पर्याय
शासनाकडून बसची प्रतिक्षा न करता दरवर्षी मनपाच्या बजेटमध्ये 2 कोटींची तरतूद केल्यास 5 बस खरेदी करणे शक्य आहे. असे केल्यास पाच वर्षात केएमटीच्या ताफ्यात 25 बस येऊ शकतात.
केएमटीच्या एकूण बसची संख्या -101
15 वर्षावरील स्क्रॅप झालेल्या बस -39
रोज ब्रेकडाऊन होणाऱ्या बस-सुमारे 5
आमदार फंडातून मिळालेल्या बस-9
पाच महिन्यांनी स्क्रॅप होणाऱ्या बस -15









