आटपाडी :
आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील प्रसिध्द श्री.सिध्दनाथ देवाच्या पौषी जनावरांची यात्रा रविवारपासुन सुरू होत आहे. खिलार जनावरांच्या खरेदी–विक्रीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यामध्ये प्रसिध्द असणाऱ्या खरसुंडी यात्रेच्या नियोजनाची तयारी आटपाडी बाजार समिती व खरसुंडी ग्रामपंचायतने आरंभली आहे.
खरसुंडी येथे रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी शेळ्या–मेंढ्यांची यात्रा भरणार आहे. 13 ते 18 जानेवारी या कालावधीत खिलार जनावरांची यात्रा भरणार आहे. खरसुंडी ते नेलकरंजी रस्त्यालगत घोडखुर व वीजबोर्ड परिसरात पौषी जनावरांची यात्रा भरणार आहे. यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्याच्या कानाकोपऱ्यातुन पशुपालक, शेतकरी, व्यापारी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असतात. त्यामुळे यात्रेच्या नियोजनाचा आढावा बाजार समिती व ग्रामपंचायतने घेतला.
आटपाडी बाजार समितीचे सभापती पै.संतोष पुजारी, सरपंच धोडीराम इंगवले, उपसभापती राहुल गायकवाड, संचालक सुबराव पाटील, शकंर भिसे, सचिव शशिकांत जाधव, सहाय्यक सचिव नारायण ऐवळे, उपसरपंच सौ.राजाक्का कटरे, शफिक तांबोळी, राहुल गुरव, सुभाष माळी, किरण पुजारी, निलेश पोमधरणे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.कोळी, ग्रामसेवक ऐवळे यांच्यासह मान्यवरांनी यात्रा स्थळाची पाहणी केली.
जनावरांच्या यात्रा कालावधीत पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, स्वच्छता, जनावरांच्या बाजारामध्ये पशुवैद्यकीय सेवा, शेतकरी–व्यापारी यांच्यासाठी वैद्यकीय सुविधा पुरविणे आदि बाबींचे नियोजन करण्यात आले. जनावरांच्या यात्रेमध्ये जातीवंत खिलार जनावरांचे प्रदर्शन शुक्रवार दिनांक 17 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आले आहे. प्रसिध्द पौषी जनावरांच्या यात्रेत जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असुन शेतकऱ्यांनी यात्रेत येताना पाण्याचा साठा करण्यासाठी बॅरेल आणावेत, असे आवाहन सभापती संतोष पुजारी यांनी केले.








