कठीण परिस्थितीतही निर्धार आणि सकारात्मकता न सोडणाऱयांना कधीना कदी यश मिळाल्याशिवाय आणि सुखाचे दिवस दिसल्याशिवाय रहात नाही, हे खरे आहे. ही कहाणी आहे 26 वर्षांच्या आग्रा येथील वीर तोमर या धीरोदात्त युवकाची.
कोरोना काळात या युवकाला बँकेने त्याची कामगिरी यथायोग्य नसल्याचे कारण दाखवत नोकरीवरुन कमी केले. आता आपण बेकार आहोत या वस्तुस्थितीने काहीकाळ तो विचलित झाला. तथापि, त्याने आपला निर्धार सोडला नाही. तसेच देवावरची श्रद्धाही अढळ ठेवली. कोरोनाच्या पहिल्या उद्रेकात त्याच्यावरच्या संकटांचाही उद्रेक झाला होता. पण स्वतःला सावरुन कोरोनाच्या दुसऱया उद्रेकात त्याने बँकेकडून काही कर्ज घेऊन दुधाचे केंद्र उघडले. पण प्रचंड तोटा झाला. कर्जाचा ईएमआयही देणेही पडवडेना. बँकेने कर्जवसुलीचा तगादा लावला. वीरची अवस्था अगदीच एखाद्या रुग्णासारखी झाली. आपण नैराश्याच्या गर्तेत जाणार आणि आपला अंत होणार, या भावनेने त्याला अक्षरशः घेरले.
वास्तविक तो उच्चशिक्षित आहे. त्याने मार्केटिंग या विषयात एमबीए केले आहे. पण सर्वत्र नकारात्मकताच त्याच्या वाटय़ाला आली होती. काही मित्रांच्या सल्ल्यावरुन त्याने काही पैसे जमा करुन काही राज्यांचा प्रवास केला. मनाला तेवढीच शांती मिळेल ही आशा होती. पण केवळ फिरत राहिल्याने पैसा मिळणार नाही याची जाणीव होताच तो परत आला. अखेर दिल्लीत लस्सीचे दुकान थाटण्याचा निर्धार केला. आज हे दुकान जोरात चालले आहे. भिन्न भिन्न चवीच्या आणि स्वादाच्या लस्सी विकण्याचा प्रयोग केला. त्याबरोबर इतरही खाण्याचे पदार्थ हळूहळू वाढत गेले. पहाटे पाच रात्री 9 पर्यंत काम तो करत आहे. आता तो नोकरीत मिळणाऱया वेतनाच्या दसपट कमाई करीत आहे. संकटे निर्माण करणाऱया परमेश्वराचे मी आभार मानतो. त्याच्यामुळेच माझ्यातला निर्धार जागा झाला, ही त्याची प्रतिक्रिया बोलकी आहे. ती अनेकांना प्रेरणा देणारी आहे.









