आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकाचे धनी ठरलेले आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नीला माधव पांडा हे भारताची पहिली क्लाय फाय थ्रिलर सीरिज घेऊन येत आहेत. या सीरिजचे नाव ‘द जेंगाबुरु कर्स’ म्हणजेच जेंगाबुरुचा शाप असे आहे.
हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीच्या मुद्द्यांवर आधारित चित्रपट किंवा सीरिजना क्लाय-फाय संबोधिले जाते. सोनी लिव्हवर द जेंगाबुरु कर्स या सीरिजचे प्रसारण होणार आहे. या सीरिजचा ट्रेलर जारी करण्यात आला आहे.

या सीरिजची कहाणी ओडिशातील एका छोट्या शहरातील दर्शविण्यात आली आहे. लंडन येथील वित्तीय विश्लेषक प्रिया दासचे वडिल प्राध्यापक दास हे संशयास्पद स्थितीत गायब झाल्याने आणि त्यामुळे प्रियाला ओडिशात परतावे लागल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. दास यांचा शोध सुरु होताच अजब घटना घडत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. या सीरिजची कहाणी मयंक तिवारी यांनी लिहिली आहे.
ही सीरिज मानवाकडून होत असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या निरंतर शोधाच्या परिणामांवर प्रकाश टाकणारी असल्याचे दिग्दर्शक पांडा यांनी म्हटले आहे. ही सीरिज 9 ऑगस्ट रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये मकरंद देशपांडे, नासर, फारिया अब्दुल्ला, दीपक संपत, सुदेव नायर, हितेश दवे हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत.









