भारतीय फुटबॉल संघ असो किंवा आताचा ‘एफसी गोवा’…मैदानात प्रतिस्पर्ध्यांच्या मनसुब्यांपुढे मोठा अडथळा येतो तो स्वत:ला पूर्णपणे झोकून देऊन खेळणाऱ्या ‘सेंटर-बॅक’ संदेश झिंगनचा…या 31 वर्षीय खेळाडूनं वेळोवेळी आपलं कौशल्य नि जिगर सिद्ध केलेली असून त्याच्या वाटचालीवर टाकलेला हा दृष्टिक्षेप…
त्या 31 वर्षीय ‘सेंटर बॅक’ला आव्हान देण्याची क्षमता असलेला खेळाडू, ‘मार्कर’ किमान सध्या तरी भारतातील एखाद्या मैदानावर खेळताना दिसत नाहीये…त्याच्या दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झाल्या आणि तरी देखील तो दहा महिन्यांनी काहीच न घडल्याप्रमाणं मैदानावर परतला तो ‘एफसी गोवा’चं प्रतिनिधीत्व करण्यासाठी…फक्त चार दिवसांच्या विश्रांतीनंतर तो चक्क संपूर्ण सामना देखील खेळला. खरं सांगायचं झाल्यास तो जवळपास प्रत्येक लढत संपूर्णच खेळलाय अन् त्याच्या आगमनानंतर गोव्याचा संघ एकही सामना हरलेला नाही…त्याच्या मते, त्यानं 100 टक्के तंदुरुस्ती मिळविण्याचा प्रयत्न कधीही केलेला नाहीये. तो जेव्हा सराव करतो तेव्हा इच्छा असते ती फक्त पूर्वीपेक्षा क्षमता वाढविण्याची…
भारताचा व ‘एफसी गोवा’चा अव्वल, दिग्गज, हार न मानणारा बचापवटू संदेश झिंगन…चांगली व्यक्ती, चांगले वडील नि आदर्श पती बनण्यास महत्त्व देणारा हा खेळाड सदोदित प्रत्यक्ष सीमेवरील एखाद्या झुंजार सैनिकाप्रमाणंच लढतोय, 100 टक्के योगदान देतोय, जिवाच्या आकांतानं आपल्या संघाचं रक्षण करतोय असं म्हटल्यास ते योग्यच ठरेल. त्यामुळंच दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढत चाललीय, युवा खेळाडूंचा तो हीरो बनलाय…त्याला गंभीर दुखापत झाली 2024 सालच्या जानेवारी महिन्यात आशियाई चषक स्पर्धेत खेळताना. मग पाळी आली ती दोन्ही गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करण्याची. बहुतेकांना संदेशची कारकीर्द संपली असंच वाटत होतं. परंतु त्या जिगरबाज खेळाडूनं पुनरागमन केलं ते शैलीदार पद्धतीनं…
प्रतिस्पर्ध्याला कुठल्याही पद्धतीनं रोखणं, चेंडूला दूर ढकलण्यासाठी गोलरेषेवर अक्षरश: झोकून देणं हा संदेश झिंगनच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय…काही दिवसांपूर्वी मलेशियाविरुद्ध भारताची जी लढत झाली त्यात प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी कर्णधारपदाची सूत्रं सोपविण्यासाठी निवड केली ती त्याचीच…संदेश जीवनाचं तत्त्वज्ञान सांगताना म्हणतोय की, त्याला प्रचंड आनंद होतो तो लोकांचे कौतुकाचे शब्द ऐकल्यानंतर. पण त्याला वाटतंय की, तो वेगळं काहीही करत नाहीये. कारण हीच तर त्याची नोकरी…
राष्ट्रीय संघाच्या आणि ‘आयएसएल’मधील ‘एटीके मोहन बगान’, ‘केरळ ब्लास्टर्स’, ‘एफसी गोवा’च्या सर्वांत विश्वासार्ह खेळाडूंपैकी एक राहिलेल्या संदेश झिंगनचा ‘स्ट्रीट फुटबॉलर’ ते व्यावसायिक फुटबॉलपर्यंतचा प्रवास हा प्रेरणादायी. याचं बरंचसं श्रेय माजी भारतीय कर्णधार बायचुंग भूतियालाही जातं… कारकिर्दीच्या सुऊवातीच्या दिवसांत म्हणजे 2011 मध्ये ‘आय-लीग’च्या दुसऱ्या विभागात खेळणाऱ्या युनायटेड सिक्कीमनं त्याला सर्वप्रथम ‘ब्रेक’ दिला..‘मी त्यावेळी दुबळा होतो आणि माझी शैलीही खूपच उतावीळ स्वरुपाची होती. भूतियानं मला अचानक फोन केला आणि सांगितलं की, त्याला युनायटेड सिक्कीममध्ये खेळताना मला पाहायचंय. तोच टर्निंग पॉइंट ठरला’, झिंगन जुन्या आठवणी जागविताना सांगतो…
भूतिया तेव्हा ‘युनायटेड सिक्कीम क्लबचा सहमालक होता…‘मला सुमारे दीड ते दोन महिने चाचण्या द्याव्या लागल्या. शेवटी भूतिया मला करारबद्ध करण्याची तयारी दाखविली. म्हणून मी नेहमीच त्याला श्रेय देतो. त्यानं त्यावेळी मला केलेल्या सूचना मूलभूत असल्या, तरी माझ्या दृष्टीने खूप मोठ्या होत्या’, तो म्हणतो…झिंगननं त्यापूर्वी कोलकात्यातील क्लबांच्या अयशस्वी चाचण्या दिल्या होत्या. परंतु ‘युनायटेड सिक्कीम’च्या माध्यमातून भारतीय फुटबॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यानं मागं वळून पाहिलं नाही…2014 साली ‘आयएसएल’मध्ये खेळणाऱ्या ‘केरळ ब्लास्टर्स’नं त्याला निवडलं. त्यानंतर राष्ट्रीय संघात बोलावणं येण्यास फारसा वेळ लागला नाही…
झिंगनच्या मते, फुटबॉलप्रेमी त्याचं ‘सैनिक’ असं वर्णन करत असले, तरी त्यात फारसं तथ्य नाहीये. कारण व्यावसायिक फुटबॉल खेळण्याची संधी मिळाली हेच फार मोठं भाग्य…दोहातल्या स्पर्धेत गंभीर दुखापतीला तोंड द्यावं लागल्यानंतर झिंगनला वाटलं होतं की, गुडघ्याची पर्वा न करता दोन-तीन महिने खेळल्यानं तंदुरुस्तीवर कोणताही परिणाम होणार नाही…कारण त्यावेळी ‘एफसी गोवा’ ‘आयएसएल शिल्ड’ जिंकण्याच्या फारच जवळ पोहोचला होता. शिवाय 2026 सालच्या ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेसाठीच्या पात्रता फेरीतील भारताच्या लढती देखील पूर्ण झाल्या नव्हत्या…
‘प्रत्येक खेळाडू कित्येकदा खोट्या भ्रमात सापडतो. दुखापत कितीही गंभीर असली, तरी त्याला वाटतं की, तो लगेच त्यातून सावरून तंदुरुस्त होणार. अशा प्रसंगी योग्य सल्ला देणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर आणि त्यांचा सल्ला ऐकणं फार महत्त्वाचं…शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय होता अन् मी देखील त्याशिवाय पर्याय नसल्यामुळं गडबडलो. मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं व ते साहजिकच होतं. खेरीज भविष्याच्या विचारानं देखील धडका देण्यास प्रारंभ केला’, झिंगनचे शब्द…परंतु साऱ्या गोष्टी त्याच्या, पाठीराख्यांच्या मनाप्रमाणं घडल्या…
संदेश झिंगनचं सुदैव म्हणजे त्याला नेहमीच साथ मिळालीय ती प्रशिक्षक मानोलेंची, पत्नीची, मुलीची, आई-वडिलांची, ‘सपोर्ट स्टाफ’ची, डॉक्टरांची, फिजिओंची, संघातील अन्य खेळाडूंची, मित्रांची अन् सर्वांत महत्त्वाचं म्हणजे फुटबॉलवर प्रेम करणाऱ्या भारतातील असंख्य रसिकांची…त्यानं आपल्या पुनरागमनाचं मोठं श्रेय दिलंय ते पत्नीला व मुलीला. कारण त्यांच्यामुळंच तो ओझ्याखाली दबून जाण्यापासून बचावला आणि फुटबॉल मैदानावर झालेली एक नेहमीची दुखापत अशाच नजरेनं त्यानं त्याकडे पाहिलं…झिंगनच्या मते, जे घडलं ते अन्यायकारक नव्हतं अन् त्यानं केव्हाही सहानुभूतीची अपेक्षा केली नाही…त्यानं जिम्नेशियममध्ये जाणं व सराव करणं या दोन गोष्टींना महत्त्व दिलं नि नेहमीच प्रचंड ऊर्जा दाखविली ती पाठीराख्यांच्या प्रचंड पाठिंब्याच्या जोरावर !
झिंगनची सुरुवातीची वाटचाल…
- 21 जुलै, 1993 रोजी जन्मलेला संदेश झिंगन हा मूळचा चंदिगडचा रहिवासी, पण एक वेळ केरळ हे त्याचं जणू दुसरं घर बनलं होतं. याचं कारण ‘केरळ ब्लास्टार्स’. तो त्या संघाचा कर्णधार होता…
- त्यानं फुटबॉलचे धडे गिरविले ते सेंट स्टीफन्स अकादमीमध्ये. या अकादमीमध्ये असताना झिंगननं संघाला मँचेस्टर युनायटेड प्रीमियर कपच्या आग्नेय आशियाई विभागाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यास मदत केली होती…त्याला 19 वर्षांखालील चंदिगड संघाचंही प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली अन् तिथं त्यानं बी. सी. रॉय चषक जिंकण्यास हातभार लावला…
- 2012-13 हंगामात युनायटेड सिक्कीमकडून खेळल्यानंतर तो मुंबईच्या ‘आय-लीग’ संघात दाखल झाला. तिथं त्यानं 2013-14 चा हंगाम घालवला…‘केरळ ब्लास्टर्स’नं त्याला 2014 मध्ये करारबद्ध केलं खरं, पण 2015, 2016 आणि 2017 च्या हंगामात तो ‘लोन’वर ‘स्पोर्टिंग गोवा’, ‘डीएसके शिवाजीयन्स’ अन् ‘बेंगळुरू एफसी’तर्फे खेळताना पाहायला मिळाला…
- ‘केरळ ब्लास्टर्स’कडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम नावावर जमा केल्यानंतर मे, 2020 मध्ये त्यांच्यासोबतचा सहा वर्षांचा प्रवास संपवून संदेशनं वाट पकडली ती ‘एटीके मोहन बगान’ची. त्यांनी त्याच्यासोबत सप्टेंबर, 2020 मध्ये केला तो पाच वर्षांचा, मोठ्या रकमेचा करार…
क्रोएशिया ते एफसी गोवा…
- 2021 मध्ये संदेश झिंगननं क्रोएशियाची वाट पकडली. त्या देशातील आघाडीचा क्लब ‘एचएनके सिबेनिच’साठी करारबद्ध होणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. परंतु दुर्दैवानं युरोपातील व्यावसायिक फुटबॉलचा भाग बनण्याचं स्वप्न पाच महिन्यांत भंगलं ते पोटरीला झालेली दुखापत अन् व्यवस्थापकाच्या स्तरावर झालेल्या बदलांमुळं. मग एकही सामना न खेळता तसंच सरावावेळी आपली योग्यता सिद्ध करण्याची संधी न मिळता झिंगनला सिबेनिचला सोडचिठ्ठी देऊन भारतात परतावं लागलं…
- 2022 साली पुन्हा संदेश एटीके मोहन बागानमध्ये सामील होऊन त्यानं त्यांच्याशी केला तो लघुमुदतीचा करार…तो संपुष्टात आल्यानंतर 2022-23 मोसमात हा खेळाडू खेळताना दिसून आला ‘बेंगळुरू एफसी’ संघातून…
- जून, 2023 मध्ये झिंगननं ‘एफसी गोवा’समवेत तीन वर्षांचा करार केला अन् तेव्हापासून तो या संघाचा अविभाज्य भाग बनलाय…
संदेशच्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे…
- 2014 नि 2016 च्या ‘इंडियन सुपर लीग’ हंगामांत उपविजेता ठरलेल्या ‘केरळ ब्लास्टर्स एफसी’चा भाग…
- 2014 मध्ये ‘आयएसएल’ हंगामातील उदयोन्मुख खेळाडू ठरण्याचा मान…त्याच वर्षी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडूनही वर्षाचा उदयोन्मुख खेळाडू म्हणून सन्मान…
- 2015 साली भारतीय संघात प्रवेश, तर 2017 मध्ये सुनील छेत्री नि गुरप्रीतसिंग संधू यांच्या अनुपस्थितीत भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती…
- ‘इंडियन सुपर लीग’मध्ये 50 सामने खेळलेला पहिला खेळाडू…
- 2020 साली अर्जुन पुरस्काराचा मानकरी…
- 2020-21 मोसमात ‘एआयएफएफ’चा वर्षातील सर्वोत्तम पुऊष खेळाडू पुरस्कार…









