जॅमरची तीव्रता कमी करण्याकडे दुर्लक्ष
बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात बसविण्यात आलेल्या जॅमरची तीव्रता अद्यापही कमी करण्यात आलेली नाही. ग्राम पंचायतीच्यावतीने आंदोलन करण्यासह महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्वत: सूचना करूनदेखील याकडे कारागृह प्रशासनाने कानाडोळा केला आहे. या गंभीर समस्येमुळे हिंडलगासह परिसरातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात कुख्यात कैदी बंदिस्त आहेत. बेंगळूर येथे परप्पन अग्रहार कारागृहानंतर हिंडलगा मध्यवर्ती कारागृह राज्यातील दुसरे अतिसुरक्षित कारागृह म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून कारागृहात सुरू असलेल्या बेकायदा घडामोडींमुळे कारागृहाची ओळख बदलत चालली आहे. कारागृहात कैद्यांना राजेशाही वागणूक देण्यासह गांजा व इतर अमलीपदार्थ अगदी सहजरित्या उपलब्ध होत आहेत. इतकेच नव्हे तर कारागृह अधिकाऱ्यांना खूश ठेवल्यास टीव्ही आणि मोबाईलदेखील पुरविले जात असल्याचा आरोप आहे.
त्यापूर्वी कारागृहातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयाला फोन करून धमकाविण्यात आले होते. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेत या प्रकरणाचा नागपूर पोलिसांसह राष्ट्रीय तपास पथकाने तपास हाती घेतला होता. यापूर्वी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात 2जी जॅमर होता. त्यामुळे 4 जी किंवा 5 जी मोबाईलवर या जॅमरचा उपयोग होत नव्हता. त्यामुळे नवीन जॅमर उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी कारागृह प्रशासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार नवीन जॅमर उपलब्ध झाल्याने कारागृहात बसविण्यात आला. मात्र या जॅमरची तीव्रता अधिक असल्याने हिंडलगा गावासह मण्णूर, आंबेवाडी, विजयनगर, गणेशपूर परिसरातील नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. मोबाईलवरून एखाद्याला फोन लावायचा असल्यास तो वेळेत लागत नाही. लागल्यास व्यवस्थित ऐकू येत नाही. हिंडलगा परिसरात पतसंस्था, बँका, व्यावसायिक दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र त्यांना ऑनलाईन सेवा पुरविताना नाकेनऊ येत आहे. त्यामुळे बहुतांशजण कॅशलेसऐवजी रोखीने व्यवहार करीत आहेत. या गंभीर प्रश्नाकडे कारागृह प्रशासनाने लक्ष घालून जॅमरची तीव्रता कारागृहापुरती मर्यादित ठेवून होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









