मृत माशांचा पडला खच : जनावरांनाही धोका, पाणी फिल्टर करून सोडण्याची ग्रा.पं.ची मागणी
बेळगाव : मार्कंडेय नदीचे पाणी दुषित झाले असून येथील माशांवरही त्यांचा विपरीत झाला आहे. जनावरांनाही त्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. कंग्राळी खुर्द व अलतगा क्रॉसला असलेल्या पुलापाशी दुषित पाण्यामुळे मृत माशांचा खच पडला आहे. त्यामुळे या नदीत येणारे शहराचे ड्रेनेज मिश्रीत पाणी फिल्टर करूनच सोडावे अशी मागणी ग्रामपंचायतीसह कंग्राळी खुर्द, अलतगा, बीके कंग्राळी, जाफरवाडी येथील हजारो शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून केएलई, अजमनगर, सदाशिवनगर, नेहरूनगर, हनुमाननगर, डेंटल कॉलेज व आजूबाजूचा परिसरातील सांडपाणी कंग्राळीच्या शेतवडीतील ओढ्यातून थेट मार्कंडेय नदीत मिसळत आहे. हे पाणी इतके दुषित व दुर्गंधीयुक्त आहे की ओढा व नदीकाठापासून 100 मीटर अंतरावर उभे राहिले तरी नाकावर ऊमाल लावावा लागतो. परिणामी याचा मोठा फटका जनावरांनाही बसत आहे. याचबरोबर नदीकाठ परिसरात असलेल्या विहिरींमध्ये हे पाणी मिश्रीत होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही त्याचा धोका निर्माण होत आहे. फेब्रुवारी पासून नाईलाजाने अलतगा क्रासला असलेल्या केटी पद्धतीच्या बंधाऱ्यांला फळ्या घालून पाणी अडवले जाते. आता दुर्गंधी वाढल्याने ग्रा.प अध्यक्ष यल्लापा पाटील, सदस्य चेतक कांबळे, विनायक कम्मार, प्रशांत पाटील, राकेश पाटील, वैजू बेन्नाळकर यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने फळ्या काढल्या असता नदीत मृतावस्थेतील माशांचा खच पडलेला दिसून आला.
पाच गावांतील जनावरांचे आरोग्य धोक्मयात
नदीतील पाणी शेतकरी पीकांना नाईलाजाने वापरतात. काही वेळा नदीकाठाकडे चरण्यासांठी गेलेली जनावरे हेच पाणी पितात. त्यामुळे हे पाणी सर्वांनाच धोकादायक आहे. महत्त्वाचे म्हणजे याच नदीच्या काठावर पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या विहिरी सुद्धा आहेत. त्यामुळे गेली 10-12 वर्षे हे पाणी फिल्टर करूनच सोडा, अशी मागणी कंग्राळी ग्रामस्थांसह चार पाच गावचे शेतकरी करत आहेत. निवेदने ही दिली आहेत. पण याकडे कोणत्याच लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. त्यामुळे जवळपास 50 हजार लोकांना तसेच पाच गावांतील जनावरांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. बेळगांव स्मार्ट करण्यासाठी शेकडो कोटी खर्च होत आहेत. पण या शहरातून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून सोडावे असे कोणालाच वाटत नाही. तरी या दुषीत पाण्याचा धोका लक्षात घेवून हे पाणी फिल्टर करूनच सोडावे अशी मागणी ग्रामपंचायत कंग्राळी व लगतच्या पाच गावच्या शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी काही लोक लोक मृत मासे गोळा करून विक्रीसाठी नेत होते. त्यांना ग्रा.पं. सदस्यांनी हटकल्यावर, नाही आम्हीच घरी खाण्यासाठी नेत आहोत अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन ते पसार झाले. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करुन पाणी फिल्टर करुन सोडावे, अशी मागणी होत आहे.









