म. ए. समितीचे नगरसेवक विचारणार जाब : अन्य मराठी भाषिक नगरसेवकांच्या भूमिकेकडे लक्ष
बेळगाव : महापालिकेच्या शनिवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेची नोटीस यावेळी पुन्हा मराठीला डावलत केवळ कन्नड व इंग्रजी भाषेत देण्यात आली आहे. त्यामुळे या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक महापालिका अधिकाऱ्यांना बैठकीत जाब विचारणार असल्याने शनिवारची बैठक वादळी ठरणार आहे. महापालिकेत मराठी भाषिक नगरसेवकांची संख्या अधिक असून महापौरदेखील मराठी भाषिकच आहेत. त्यामुळे इतर मराठी भाषिक नगरसेवक मराठी भाषेचा मुद्दा उचलून धरणार का? हे मात्र पहावे लागणार आहे. महानगरपालिकेचा कारभार यापूर्वी मराठी भाषेतून चालत होता.
मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे म. ए. समितीच्या नगरसेवकांची संख्या घटल्याने सध्या केवळ कानडी भाषेतून महापालिकेची सर्वसाधारण सभा व इतर कारभार चालविला जात आहे. त्यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची नोटीसदेखील यापूर्वी कन्नडबरोबरच भाषांतर केलेली कॉपी मराठीतून दिली जात होती. मात्र आता गेल्या काही वर्षांपासून बैठकांच्या नोटिसा कन्नड आणि इंग्रजी भाषेत दिल्या जात आहेत. त्यामुळे मराठी भाषिक नगरसेवकांना बैठकीची नोटीस व विषय पत्रिका समजणे कठीण जात आहे.
कन्नडबरोबरच मराठी भाषेतदेखील सर्वसाधारण सभेची नोटीस देण्यात यावी, अशी मागणी दरवेळी म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे व त्यांचे सहकारी करत असतात. मात्र लंगडी कारणे सांगत अधिकारी वेळ मारून नेत आहेत. महापालिकेत मराठी भाषांतरकार नसल्याने मराठीतून नोटीस देणे अशक्य असल्याचे सांगितले जात आहे. मात्र मराठी भाषांतरकाराची नियुक्ती करण्यास काय अडचण आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दिलेली नोटीसच समजत नसेल तर ती नोटीस देऊन काय उपयोग? असा प्रश्नही मराठी नगरसेवकांतून विचारला जात आहे.
यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत नगरसेवक रवी साळुंखे शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मराठी नोटीस देण्याबाबत सभागृहात आवाज उठविला होता. त्यावेळी पुढच्या बैठकीवेळी यावर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र शनिवार दि. 5 रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीची नोटीस केवळ कन्नड आणि इंग्रजी भाषेत देण्यात आली आहे. मराठी भाषेला पुन्हा डावलण्यात आल्याने याबाबत म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे व त्यांचे सहकारी सभागृहात आवाज उठवून अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत. सध्याचे महापौर मंगेश पवार हे देखील मराठी भाषिकच आहेत. राष्ट्रीय पक्षातून निवडून आलेले बहुतांश नगरसेवकही मराठी भाषिकच आहेत. त्यामुळे मराठीचा मुद्दा मराठी भाषिक नगरसेवक उचलून धरणार की मूग गिळून गप्प बसणार? हे मात्र पहावे लागणार आहे.









