आजच्या कामकाजाविषयी साशंकता : पंचमसाली आंदोलनप्रश्नी विरोधक आवाज उठवणार
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गुरुवारी पंचमसाली आंदोलकांवरील लाठीहल्ल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येणार आहे. यासाठी भाजप नेत्यांनी तयारी केली असून अधिवेशनाचा चौथा दिवसही गदारोळातच जाणार, अशी शक्यता आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. सोमवार दि. 9 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला आहे. पहिला दिवस दुखवटा व्यक्त करण्यात गेला. मंगळवारी माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या निधनामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बुधवार दि. 11 डिसेंबर रोजी सरकारी सुटीमुळे दोन्ही सभागृहांचे कामकाजही बंद ठेवण्यात आले होते.
आता चौथ्या दिवशी गुरुवारपासून कामकाजाला सुरुवात होणार आहे. गुरुवारपासून तरी कामकाज सुरळीत होणार अशी अपेक्षा होती. मात्र, मंगळवारी सुवर्णसौधला घेराव घालण्यासाठी निघालेल्या पंचमसाली आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्यामुळे पंचमसाली समाजाचे नेते संतापले आहेत. सभागृहात गुरुवारी याच मुद्द्यावर गदारोळ माजण्याची शक्यता आहे. कोंडुसकोपजवळ गुरुवारपासून अधिवेशनाच्या शेवटपर्यंत धरणे धरण्याचा निर्णय पंचमसाली जगद्गुरू श्री बसवजयमृत्युंजय स्वामीजींनी जाहीर केला आहे. याबरोबरच गुरुवारी बेळगावसह संपूर्ण राज्यात रास्तारोको करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. आरक्षण आंदोलनातील आघाडीचे नेते बसनगौडा पाटील-यत्नाळ, विरोधी पक्षाचे उपनेते अरविंद बेल्लद यांच्यासह भाजपमधील अनेक पंचमसाली नेत्यांनी गुरुवारी विधानसभेत लाठीहल्ल्याच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरण्याचे ठरविले आहे.
कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासापासून केली जाते. वक्फ बोर्डच्या मुद्द्यावर भाजपने पहिल्या दिवशीच स्थगन प्रस्ताव मांडला आहे. यावर अद्याप निर्णय झाला नाही. आता पंचमसाली आंदोलकांवरील लाठीहल्ल्याचा मुद्दा दोन्ही सभागृहात ठळक चर्चेला येणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपच्या राजवटीत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले अॅफिडेव्हिट व न्यायालयाचा आदेश सभागृहात मांडण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे या मुद्द्यावर विरोधी पक्ष व सत्ताधारी यांच्यात खडाजंगी होण्याची शक्यता आहे.









